मुंबई : एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हांटेज फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) नुकताच १ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. असा टप्पा गाठणारा एचडीएफसी म्युच्युअल फंड घराण्याचा हा पहिला, तर भारतातील केवळ दुसरा फंड ठरला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्प्पा गाठला होता. १ फेब्रुवारी १९९४ पासून अस्तित्वात असलेल्या एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडाला १ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठायला ३१ वर्षे लागली. बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, हा हायब्रिड फंड गटात मोडणारा फंड आहे. समभाग आणि रोखे यांत संतुलित प्रमाणात गुंतवणूक करणारा हा फंड असून त्यातील गुंतवणुकीचा समतोल राखून दीर्घकालीन भांडवली लाभ आणि नियमित उत्पन्न प्रदान करणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न (मासिक लाभांश) देण्याची प्रथा या फंडाने सुरू केली. गोपाल अग्रवाल आणि अनिल बांबोळी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपलब्ध आकडेवारीनुसार, ३० एप्रिल २०२५ रोजी या फंडाची मालमत्ता ९७,४६० कोटी होती. मार्च २०२५ रोजी या फंडाची मालमत्ता ९३,४४०.८९ कोटी रुपये होती. या फंडाच्या ‘रेग्युलर ग्रोथ प्लॅन’ने सुरुवातीपासूनच १८.२३ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. फंडाच्या ‘रेग्युलर ग्रोथ प्लॅन’मधील मूळच्या १ लाख गुंतवणुकीचे २७ मे रोजी, १ कोटी ९० लाख रुपये झाले आहेत. तर सुरवातीपासून १००० रुपयांची मासिक ‘एसआयपी’ केलेल्या ३.७६ लाखांचे आज १.५५ कोटी रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर १८.३३ टक्के राहिला आहे.