वृत्तसंस्था, नवी दिल्ली

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ ते १० आधारबिंदूंनी वाढीची घोषणा बुधवारी केली. नवीन दरवाढ गुरुवारपासून (८ फेब्रुवारी) लागू झाली असून, यातून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँक गुरुवारी पतधोरण जाहीर करणार असून त्याआधीच एचडीएफसी बँकेने कर्जाचे दर वाढविले आहेत.

सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील एचडीएफसी बँकेचे व्याजदर ०.५ टक्क्यांनी वाढून ९.३० टक्क्यांवर गेले आहेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी ८.९० टक्के, तर तीन महिने आणि सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे ९.१० टक्के आणि ९.३० टक्के झाला आहे. तसेच दोन आणि तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता ९.३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 7 February 2024: सोन्याच्या दरात बदल, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ केल्याने बँकांनी देखील कर्जाचे दर वाढविले. त्यानंतर सलग पाच द्विमासिक बैठकांमधून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. मात्र तरी बँकांनी कर्जावरील व्याजदरात केलेल्या वाढीच्या तुलनेत अजूनही मुदत ठेवींवर देय व्याजदर वाढविलेले नाहीत.