Hindenburg case SEBI gives clean chit to Adani Group : गौतम अदाणी आणि अदाणी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. भांडवली बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’ (SEBI) ने गुरुवारी अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने (Hindenburg Research) अदाणी समूहावर केलेले स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत. एकंदरीl हिंडनबर्गने केलेल्या आरोपांनंतर सेबीने अदाणी समूहाला क्लीन चीट दिली आहे.
सेबीने अदाणी समूहावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असे म्हटले आहे. तसेच सेबीने गौतम अदाणी, राजेश अदाणी, अदाणी पोर्ट आणि अदाणी पॉवर याच्याविरोधात दंड किंवा कारवाईची शक्यताही नाकारली आहे.
सेबीला कोणतेही उल्लंघन झाल्याचे आढळून आले नाही, संबंधित नसलेल्या पार्टीबरोबरच्या अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी त्यावेळी रिलेटेड पार्टी डिलिंग्ज ही व्याख्या लागू नव्हती (ही व्याख्या २०२१ च्या सुधारणेनंतर लागू करण्यात आली) असे सेबीने दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये नमूद केले आहे.
सेबीने असेही नमूद केले आहे की, कर्जांची व्याजासह परतफेड करण्यात आली, तसेच कोणताही निधी बाहेर वळवला गेला नाही. त्यामुळे कोणतीही फसवणूक किंवा ‘अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस’ झाली नाही. त्यामुळे अदाणी समूहाविरोधातील सर्व प्रकरणे रद्द करण्यात येत आहेत.
हिंडेनबर्गने जानेवारी २०२१ मध्ये आरोप केला होता की अदाणी समूहाने अॅडिकॉर्प इंटरप्रायजेस (Adicorp Enterprises), माइलस्टोन ट्रेडलिंक्स (Milestone Tradelinks), आणि रेहवार इन्फ्रास्ट्रक्चर (Rehvar Infrastructure) या तीन कंपन्यांचा वापर अदाणी ग्रुप फर्म्समध्ये पैसे वळवण्यासाठी केला. यानंतर असा दावा केला गेला की, यामुळे अदाणी समूहाला गुंतवणूकदारांची दिशाभूल होऊ शकते अशा रिलेटेड पार्टी ट्राजिक्शन संबंधी नियम टाळण्यात मदत झाली.
हिंडेनबर्गच्या अहवालात कशावर बोट?
अब्जाधीश उद्योगपती गौतम अदाणी यांच्या मालकीच्या अदाणी समूहातील कंपन्यांविषयी हिंडेनबर्ग रिसर्चच्या १०६ पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. अदाणी समूहातील कंपन्यांनी भांडवली बाजारात आपल्या समभागांचे भाव फुगवल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच अदाणी समूहाने बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही हिंडेनबर्गने केला होता. कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने समभागांचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता.