scorecardresearch

सेवा क्षेत्राची वाढ मंदावली

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जानेवारी महिन्यात ५७.२ गुणांवर नोंदला गेला. डिसेंबरमध्ये तो ५८.८ गुणांवर होता.

January, services sector ,India, growth
सेवा क्षेत्राची वाढ मंदावली ( Representative AP Image )

पीटीआय, नवी दिल्ली

सेवा क्षेत्रातील उत्पादन आणि विक्रीतील वाढ मंदावल्याने जानेवारीमध्ये सेवा क्षेत्राची वाढ खुंटली असून, नजीकच्या भविष्यातील सेवा क्षेत्राच्या वाटचालीबद्दल सेवा प्रदात्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि याचा रोजगार निर्मितीवरदेखील परिणाम झाला आहे, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने स्पष्ट केले.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जानेवारी महिन्यात ५७.२ गुणांवर नोंदला गेला. डिसेंबरमध्ये तो ५८.८ गुणांवर होता. मात्र सलग १८ व्या महिन्यात सेवा क्षेत्राची दमदार वाटचाल सुरू राहिली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

नवीन वर्षात देशांतर्गत पातळीवर नवीन व्यवसायांच्या वाढीमुळे मागणी वाढली आहे. मात्र दुसरीकडे निर्यातीच्या आघाडीवर मात्र पीछेहाट झाल्याने कंपन्यांच्या एकंदर विक्रीवर परिणाम झाला आहे. किमतीच्या आघाडीवर, सरलेल्या महिन्यात अन्नधान्य, इंधन दरवाढ, किरकोळ खर्च, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी आणि वाहतूक यांवरील खर्च वाढला आहे, असे निरीक्षण ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी नोंदविले. सेवा क्षेत्रातील उत्पादनाशी निगडित महागाई खर्च (इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन) जानेवारीमध्ये दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला, त्या परिणामी विक्रीच्या किमतींमध्ये कमी ते मध्यम वाढ नोंदवण्यात आली. सेवांना मागणी जास्त असल्याने ग्राहकांकडे वाढीव खर्च हस्तांतरित करणे शक्य झाले आहे, मात्र अनेक कंपन्यांनी शुल्क वाढवण्याऐवजी अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन केला, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

कंपन्यांनी सध्याच्या पातळीपासून सेवांच्या उत्पादनात कोणताही बदल होणार नसल्याने भाकीत केले आहे. यावरून कंपन्यांचा आत्मविश्वास काहीसा कमी झाल्याने जानेवारीमध्ये रोजगार निर्मितीचा वेगदेखील धिमा राहिला, असे डी लिमा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 09:18 IST