Does Income Tax Department delay big Income tax refund like above Rs 50,000? :आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर रोजी संपली आहे, यानंतर आता लाखो करदाते हे त्यांच्या इन्कम टॅक्स रिफंडची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यादरम्यान त्यांना एक वेगळीच चिंता सतावत आहे. या रिफंडची रक्कम ५०,००० रूपयांपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स विभाग रिफंडच्या प्रक्रियेला उशीर करत आहे का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. त्यामुळे रिफंड मिळण्याच्या प्रक्रियेला नेमका कशामुळे उशीर होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

इन्कम टॅक्स नियामतांनुसार, रिफंडच्या रकमेवर कुठलीही कमाल मर्यादा घालण्यात आलेली नाही. जर तुमचा रिफंड १० हजार रुपये किंवा एक लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल तरीही तो एकाच पद्धतीने क्रेडिट केला जातो. मात्र जर रिफंडची रक्कम खूपच मोठी असेल तर मात्र विभागाकडून अतिरिक्त तपासणी केली जाऊ शकते, ज्यामुळे कदाचित प्रक्रियेला थोडासा विलंब होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लवकर आयटीआर दाखल करणाऱ्यांचा फायदा

मुदतीच्या खूप आधी आयटीआर दाखल करणाऱ्यांचे ई-व्हेरिफिकेशन अगदी काही तासांमध्ये पूर्ण होते आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये आयटीआरची प्रोसेस होऊन त्याच दिवशी रिफंड देखील मिळून जातो.

याउलट ज्यांनी आयटीआर मुदत संपण्याच्या दिवशी दाखल केला आहे, जसे की १५ किंवा १६ सप्टेंबर त्यांना मात्र वेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेवटच्या दिवशी पोर्टलवर उरलेले सर्वजण तुटून पडतात आणि यामुळे ई-व्हेरिफिकेशनसाठी २४ ते ४८ तास लादतात आणि प्रोसेस देखील खूप मंद गतीने होते.

रिफंड मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिफंड सामान्यतः तुमच्या बँक खात्यात २ ते ५ आठवड्यांच्या आत येतो, असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. जर तुमचा रिटर्स सामान्य असेल जसे की फक्त पगारातून मिळणारे उत्पन्न आणि बेसिक डिडक्शन तर तुम्हाला रिफंड अधिक लवकर मिळू शकतो. मात्र जर तुमच्या रिटर्नमध्ये बिझनेस इन्कम, कॅपिटल गेन्स किंवा अनेक डिडक्शन असतील तर विभागाकडून अधिकची तपासणी केली जाते, ज्यामुळ प्रक्रियेला जास्त वेळ लागू शकतो.

आयटीआर रिफंडला उशीर का होतो?

वेगवेगळ्या कारणांमुळे तुमचा रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो, जसे की पॅन, आधार किंवा बँकेच्या तपशीलांमध्ये काहीतरी अडचण आली तर, किंवा बँक खाते प्री-व्हॅलिडेटेड नसेल तर, आयएफएससी कोड चुकीचा असेल किंवा बँक खाते बंद असेल तर उशीर होऊ शकतो. टीडीएस डेटा चुकला किंवा तापासणीत काहीतरी गडबड आढळून आली तरी देखील रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो.

रिफंड स्टेटस कसं तपासावं?

तुम्ही रिफंड स्टेटस ttp://www.incometax.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करून तपासू शकता. यामध्ये ई-फाईल टॅबमध्ये जा आणि व्ह्यूव फाईल्ड रिटर्न्स हा पर्याय निवडा आणि त्यानंतर रिफंड स्टेटसवर क्लिक करा. येथे तुम्ही रिफंडचे स्टेटस तपासू शकता.