मुंबई : कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी रिलायन्स रिटेल, जिंदाल पॉवर आणि अदानी समूहासह इतर कंपन्या आखाड्यात उतरल्या आहेत. एकूण ४९ कंपन्यांनी फ्युचर रिटेलच्या मालमत्ता खरेदीस इच्छुक असल्याचे इरादापत्र सादर केले आहे.बिग बझार, फूड बझार, इझी डे आणि फूडहॉल अशा नावांनी देशभरात ४३० शहरांमध्ये एके काळी १,५०० हून अधिक विक्री दालनांची साखळी विणणाऱ्या किशोर बियाणी प्रवर्तित फ्युचर रिटेलच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सध्या ‘नादारी व दिवाळखोरी संहिते’नुसार सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या किराणा व्यवसायातील कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज व फ्लेमिंगो समूह यांनी संयुक्त भागीदारीत स्थापित केलेली एप्रिल मून रिटेल यांनी पुन्हा एकदा फ्युचर रिटेलच्या मालमत्ता खरेदीसाठी इच्छुक असल्याचा अर्ज सादर केला आहे. फ्युचर रिटेलच्या कर्जदात्या बँका आणि अन्य देणेकऱ्यांनी कंपनीच्या मालमत्ता विभागून त्यांच्या विक्रीसाठी पुन्हा बोली मागवल्या होत्या.
फ्युचर रिटेलच्या कर्जदात्यांनी २३ मार्च रोजी पुन्हा नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला. ७ एप्रिल २०२३ ही इरादापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख होती. कंपनीच्या मालमत्ता व्यवसाय चालविणाऱ्या विविध पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. स्वारस्य असणारी कंपनी ही एक तर फ्यूचर रिटेलवर तिच्यासह, तिच्या उपकंपन्यांच्या सर्व भागभांडवलाची संपूर्णपणे मालकी मिळवून शकतील, अथवा विभाजित पाचपैकी एक वा अधिक मालमत्तांची खरेदी करू शकतील.
फ्युचर रिटेलच्या मालमत्तांच्या विक्रीच्या या प्रक्रियेत ४९ कंपन्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात सेंच्युरी कॉपर, ग्रीनटेक वर्ल्डवाईड, हर्ष वर्धन रेड्डी, जे सी फ्लॉवर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन, पिनॅकल एअर, युनिव्हर्सल असोसिएट्स आणि डब्लू एच स्मिथ ट्रॅव्हल या प्रमुख नावांसह, इतर कंपन्यांनीही मालमत्ता खरेदीत स्वारस्य दाखविले आहे. त्याआधीच्या प्रक्रियेत दोनदा मुदतवाढ देऊनही ११ कंपन्यांनी इरादापत्रे दाखल केली होती, ज्यात रिलायन्स रिटेल, एप्रिल मून रिटेल (अदानी) यांचा समावेश होता.