मुंबई : रिझर्व्ह बँकेने सरलेल्या सप्ताहअखेर सलग चौथ्यांदा ‘रेपो दरा’त कोणताही बदल न करता ते ६.५० टक्के या पातळीवर कायम ठेवले. मात्र मध्यवर्ती बँकेचा हा निर्णय येण्याच्या दोन दिवस आधी सहा बँकांनी तर त्यानंतर दोन बड्या बँकांनी ठेवीदारांना अधिक लाभ देणारे व्याजदरात बदल जाहीर केले आहेत.
आता सात टक्क्यांखाली ओसरलेल्या महागाईला येत्या काळात ४ टक्के या लक्ष्यापर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य राखत, रिझर्व्ह बँकेने कठोर पवित्राही कायम राखला आहे. तथापि गेल्या वर्षभरात झालेल्या अडीच टक्क्यांच्या रेपो दर वाढीचा प्रभाव वित्तीय व्यवस्थेने पूर्णत्वाने आत्मसात केला नसल्याचे कारण देत तूर्त यथास्थिती कायम ठेवण्याच्या तिच्या भूमिकेने, प्रत्यक्षात बँकांना ठेवीदारांना अधिक लाभ देण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे गत शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने, तर सोमवारी बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींवरील व्याजदरात तब्बल अर्धा टक्क्याची वाढ केली आहे.
हेही वाचा >>> स्विस बँक खात्यांच्या तपशिलाचा पाचवा संच भारताला हस्तांतरित
बँक ऑफ बडोदाने एनआरओ आणि एनआरई मुदत ठेवींसह देशांतर्गत किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये तीन वर्षांपर्यंतच्या विविध मुदतींसाठी ५० आधारबिंदूंपर्यंत (अर्धा टक्का) वाढ केली आहे. सुधारित व्याज दर ९ ऑक्टोबर २०२३ पासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर लागू झाले आहेत. दरवाढीपश्चात बँकेकडून सामान्य नागरिकांसाठी दसादशे ७.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दसादशे ७.९० टक्क्यांपर्यंत (ज्यात ज्येष्ठांसाठी अर्धा टक्के अतिरिक्त व्याज दर समाविष्ट) आणि तर नॉन-कॉलेबल (मुदतपूर्व वठवता येऊ न शकणाऱ्या) ठेवींसाठी ०.१५ टक्के अतिरिक्त व्याजदर बँकेने देऊ केला आहे. बँकेच्या ३९९ दिवस मुदतीच्या तिरंगा प्लस ठेव योजनेवरील व्याजदरदेखील आनुषंगिक वाढ करणारा बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> आरोग्य विमा कंपन्यांकडून नियमावलीला हरताळ, रुग्णालय चालकांच्या संघटनेकडून आरोप
कॅनरा बँकेने ५ ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या निर्णयानंतर लगेचच ठेवींवरील व्याज दरात सुधारणा केली. त्यानुसार ज्येष्ठांसाठी कमाल व्याज दर ४४४ दिवसांसाठी ७.७५ टक्के करण्यात आला आहे आणि नॉन-कॉलेबल ठेवींसाठी, ४४४ दिवसांसाठी सर्वाधिक व्याज दर ७.९० टक्के प्रति वर्ष, तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ टक्के असा बँकेचा सर्वोच्च दर आहे. त्याआधी येस बँक (४ ऑक्टोबर), कर्णाटक बँक (३ ऑक्टोबर), एचडीएफसी बँक (१ ऑक्टोबर), आयडीएफसी फर्स्ट बँक (१ ऑक्टोबर) या खासगी क्षेत्रातील बँकांनी ठेवींवर सुधारित व्याज दर लागू केले आहेत. बँक ऑफ इंडियानेही १ ऑक्टोबरपासून मुदत ठेवींवर अर्धा टक्क्यांपर्यंत वाढ लागू केली आहे.