वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या भावाने बुधवारी उसळी घेतली. भारताकडून आयात होणाऱ्या तेलाच्या दराचा मापदंड असलेल्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रतिपिंप ८० डॉलरवर पोहोचला.येमेनच्या हद्दीतील लाल समुद्रात इराणशी संलग्न हूथी फौजांनी जहाजांवर हल्ले केल्याने खोळंबळलेल्या वाहतुकीच्या परिस्थितीने तेलाचे भाव तापत चालले आहेत. आखाती देशातील भूराजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर पुरवठ्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. कंपन्यांनी त्याची तेलवाहतूक करणारी जहाजे दुसऱ्या मार्गाने वळविली आहेत. त्यामुळे वाहतूक आणि विम्याचा खर्च वाढणार आहे. याचा परिणाम होऊन ब्रेंट क्रूडचा भाव प्रतिपिंप १.१ टक्क्याने वाढून ८०.१२ अब्ज डॉलरवर पोहोचला.

येमेनच्या हद्दीतील लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जहाजांनी जाणे टाळावे, असा सल्ला ग्रीसने दिला आहे. ग्रीसमधील जहाजमालकांकडून जगातील एकूण जलवाहतुकीपैकी २० टक्के जलवाहतूक होते. याच वेळी अमेरिकी नौदलाने व्यावसायिक जहाजांच्या संरक्षणासाठी मोहीम हाती घेतली आहे. लाल समुद्रातून एकूण जलवाहतुकीपैकी १२ टक्के वाहतूक होते. तेलाचा पुरवठा दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आला असला तरी अद्याप कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही, अशी माहिती विश्लेषकांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.