नवी दिल्ली : देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ सरलेल्या मार्च महिन्यात मंदावली आहे. सेवा क्षेत्राने फेब्रुवारी महिन्यात १२ वर्षांतील उच्चांकी कामगिरी नोंदवली होती. मात्र, मार्चमध्ये त्यात घसरण झाली आहे. नव्याने आलेला कामांचा ओघ काही प्रमाणात कमी झाल्यामुळे ही घट नोंदवण्यात आल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक मार्च महिन्यात ५७.८ गुणांवर नोंदला गेला. मार्चमध्ये गुणांक कमी झाल्याने सेवा क्षेत्राचा विस्ताराचा वेगही कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये नवीन कामांचा ओघ काहीसा मंदावला असला तरी त्याचा दर सकारात्मक होता.
हेही वाचा >>> ऐकावं ते नवलच! ४४ कोटींची लॉटरी जिंकली, पण कॉल करणाऱ्याला फेक समजून केलं ब्लॉक आणि मग…
पीएमआय निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ५९.४ गुणांवर नोंदला गेला होता. या निर्देशांकाने नोंदविलेली ही १२ वर्षांतील उच्चांकी पातळी होती. मार्चमध्ये सलग २० व्या महिन्यात सेवा क्षेत्राची ५० गुणांवर कामगिरी राहिली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचा निदर्शक मानला जातो.
रोजगारात अत्यल्प वाढ
सेवा क्षेत्रात सलग दहाव्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. असे असले तरी नवीन रोजगार निर्मिती करण्यात सेवा क्षेत्र अपयशी ठरले आहे. कंपन्यांकडून मनुष्यबळात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सध्या पुरेसे मनुष्यबळ असल्याने नवीन भरती होत नसल्याचे अनेक कंपन्यांनी सर्वेक्षणात म्हटले आहे.
भारतीय सेवा क्षेत्राची फेब्रुवारीत दमदार वाटचाल दिसून आली. या जोरावर आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील शेवटच्या तिमाहीत नवीन आलेल्या कामांचा ओघ आणि उत्पादनात वाढ नोंदवण्यात आली. असे असले तरी वाढीची धुरा आता निर्मिती क्षेत्राकडे आली आहे.
– पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स