Microsoft engineer shares secret : जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यामध्ये वेगाना बदल होताना पाहायला मिळत आहेत. काही कनिष्ठ स्तरावरील नोकऱ्यांची जागा आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्स म्हणजेच एआय घेताना दिसत आहे. तर अनेकांना त्यांची नोकरी जाईल अशी भीता वाटत राहते. यादरम्यान एक भारतीय वंशाच्या इंजिनियर रित्विका नागुला यांनी मात्र वेगळाच अनुभव सांगितला आहे. कमालीची स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात तिने अवघ्या पाच वर्षांत चार वेळा पदोन्नती मिळवली आहे.
पहिल्या वर्षी काय भूमिका होती?
एप्रिल २०१९ मध्ये पहिल्यांदा नागुला यांनी मायक्रोसॉफ्टच्या Azure विभागात काम करण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांना विश्वास होता की सतत्यपूर्ण, उच्च दर्जाचे काम हे आपोआप त्यांना वरच्या पातळीवर घेऊन जाईल. “मला वाटले होते की जर मी चांगले निकाल देत राहिले तर मला पदोन्नती मिळत राहतील,” असे त्यांनी बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पण त्यांच्या पहिल्या वर्षात मात्र त्यांना याच्या विरुद्ध अनुभव आला. स्वतःच्या महत्त्वाकांक्षांबद्दल गप्प राहिल्याने त्यांच्यात महत्त्वाकांक्षाच नाहीत असा समज होऊ शकतो हे त्यांना जाणवले. पण करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात आलेल्या या अनुभवामुळे त्यांनी काम आणि त्यांचे मॅनेजर यांच्याबद्दलची भूमिका बदलली.
दुसऱ्या वर्षात नेमकं काय बदललं?
दुसऱ्या वर्षांपासून नागुला यांनी त्यांच्या मॅनेजरबरोबर प्रत्यक्षात वैयक्तिक मिटिंगचे नियोजन करणे सुरू केले. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या विकासाकडे लक्ष देण्याबाबत दर महिन्याला एकदा तरी चर्चा होईल याची काळजी घेणे सुरू केले.
या बैठकीत त्या मॅनेजरसाठी काही प्रश्न घेऊन जात, जसे की सर्वकाही व्यवस्थित आहे का? मी कोणत्या क्षेत्रात सुधारणा करू शकते? माझ्याकडून काय राहून जात आहे? त्यांनी स्वतःसाठी एक वेळापत्रक देखील ठरवले होते, ज्यामध्ये त्यांनी १८ ते २४ महिन्यात वर सरकण्याचे ध्येय ठरवून घेतले होते.
“तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावे लागेल की सध्या तुमच्याकडून काय अपेक्षित आहे आणि पुढच्या स्तरावर काय अपेक्षित असेल. त्यानंतर यातील फरक आणि तो कसा कमी करायचे ते शोधून काढा,” असेही त्यांनी सांगितले.
फिडबॅक महत्त्वाचा घटक
नागुला यांनी फिडबॅक हा त्यांच्या कामाचा भाग बनवला, त्या फक्त त्यांच्या मॅनेजरकडूनच नाही तर सहकारी आणि इतर मेटॉर्सकडून देखील त्या सतत अभिप्राय घेत. जेव्हा त्यांना समजले की वरिष्ठ पदासाठी एखाद्या प्रोजेक्टचे नेतृत्व अखेरपर्यंत करावे लागते, त्यानंतर त्यांनी अशी जबाबदारी मिळावी यासाठी वाट पाहिली नाही तर त्यांनी ती मागून घेतली.
त्यांच्या विनंत्या या थेट आणि नेमक्या असत, “जर आपण माझ्या पुढील प्रमोशनचा विचार करत असू तर मला वाटते की मला पूर्ण प्रोजेक्टचे नेतृत्व करावे लागेल. आपण त्यासाठी योग्य संधी कशी शोधू शकतो?” अशी थेट भूमिका घेतल्याने मॅनेजरने त्यांना अधिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलेली व्यक्ती म्हणून पाहण्यास सुरूवात केल्याचे त्यांनी सांगितले.
“पदोन्नती मिळवणे हे फक्त तुम्हाला दिलेले काम करणे नव्हे, तर त्यासाठी कामाची जबाबदारी घेणे, नवीन संधी शोधणे आणि तुमच्या कामामुळे महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत याची खात्री करणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले
स्वत:ची क्षमता ओळखणे, योग्य ध्येय ठरवणे आणि मोठा परिणाम साधणारे काम करून दाखवणे या सर्व कौशल्यामुळे त्यांना पाच वर्षांत पदवीधर ते थेट वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पदापर्यंत पोहोचता आले.