विद्यमान आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेने वार्षिक आधारावर ८ टक्के वाढ नोंदवली असून घाऊक मूल्यात १८ टक्के वाढ दिसून आली, असे काउंटरपॉइंटच्या अहवालातून समोर आले आहे. पहिल्या तिमाहीत मंदीनंतरची ही चांगली वाढ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत आयफोन १६ हा सर्वाधिक विक्री होणारा फोन ठरला आहे. एकूणच, कंपन्यांकडून नवीन फोन सादर करण्यामध्ये झालेली ३३ टक्के वाढ, आक्रमक विपणन व्यवस्था (मार्केटिंग) आणि वाढलेल्या विक्रीमुळे मोबाईलफोन बाजारपेठेने वाढ नोंदवली आहे.
विविध स्मार्टफोन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, सोपे ईएमआय (समान मासिक हप्ते) आणि विविध सवलतीच्या योजनांमुळे ही वाढ शक्य झाली आहे. मोबाईल फोन विक्रीमध्ये व्हिव्होने अव्वल स्थान पटकावले, तर मूल्य निर्देशांकात सॅमसंग आणि अॅपल आघाडीवर होते. दुसऱ्या तिमाहीत भारतातील स्मार्टफोन बाजारातील सुधारणा सुधारित समष्टि आर्थिक वातावरणामुळे झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास आणि खर्च वाढल्याचे निदर्शनास येत आहे, असे मत काउंटरपॉइंटचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक प्राचीर सिंग म्हणाले. किरकोळ महागाई सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली, ज्यामुळे घरगुती खर्चावरील दबाव कमी झाला, तर मध्यवर्ती बँकेच्या रेपो दर कपातीमुळे वित्तपुरवठा अधिक सुलभ झाला. याव्यतिरिक्त, वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पातून दिलेल्या कर सवलतीच्या उपायांमुळे खर्च करण्यायोग्य उत्पन्न आणि बचत वाढली आहे, असेही ते म्हणाले.
सुधारत असलेल्या भावनेमुळे अल्ट्रा-प्रीमियम (४५,००० रुपयांपेक्षा जास्त) विभागाच्या वार्षिक ३७ टक्क्यांच्या मजबूत वाढीस हातभार लागला, ज्यामुळे तो सर्वात वेगाने वाढणारा किंमत स्तर बनला, असे निरीक्षण सिंग यांनी नोंदवले. जागतिक तंत्रज्ञान बाजार संशोधन संस्थेनुसार, व्हॉल्यूमच्या बाबतीत, व्हिव्होने २० टक्के, सॅमसंगने १६ टक्के, ओप्पो (१३ टक्के), रियलमी (१० टक्के) आणि शाओमी (८ टक्के) हिस्सा राखला आहे.
घाऊक मूल्याच्या बाबतीत, सॅमसंग आणि अॅपलने प्रत्येकी २३ टक्के, विवोने १५ टक्के, ओप्पो (१० टक्के), रियलमी (६ टक्के) आणि वनप्लस (४ टक्के) अशी आघाडी घेतली.