नवी दिल्ली : अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापार युद्धाच्या झळा भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने ५० टक्के व्यापार शुल्क लादल्यानांतर विविध क्षेत्रातील महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे केंद्र सरकारने वस्तू व सेवाकरात कपात केल्यामुळे दिलासा देखील मिळेल. मात्र वाढत्या महागाईची चिन्हे ऑगस्ट महिन्यात दिसू लागली आहेत.
भाज्या, मांस आणि माशांसह ठराविक अन्नपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे सरलेल्या ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दराने २.०७ टक्क्यांची पातळी गाठली आहे, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीवासून स्पष्ट झाले. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर आधीच्या जुलै महिन्यात १.६१ टक्क्यांपर्यंत घसरला होता. तर गेल्यावर्षी याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२४ मध्ये तो ३.६५ टक्के नोंदवला गेला होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये भाजीपाला, मांस आणि मासे, तेल, वैयक्तिक निगा उत्पादने, अंडी यांच्या महागाईत वाढ झाल्यामुळे अन्नधान्य महागाईसह मुख्य महागाई दरात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात भाजीपाला महागाई १५.९ टक्के नोंदवली गेली.
मांस आणि माशांच्या किमती १.५ टक्के दराने वाढल्या आहेत, तर मागील महिन्यात ०.६ टक्के होत्या. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर ऑगस्ट महिन्यात २.६ टक्के होता. कपडे आणि पादत्राणे महागाई दर जुलै महिन्यातील २.५ टक्क्यांवरून २.३ टक्क्यांवर आला आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई कमी झाली असून ती २.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. जी जुलैमध्ये २.७ टक्के होती. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांच्या पातळीवर मर्यादित राखण्याचे निर्देश दिले आहेत.
अन्नधान्य महागाई वाढली
अन्नधान्य महागाईचा दर सरलेल्या ऑगस्टमध्ये (उणे) -०.६९ टक्क्यांवर पोहोचली आहे, जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात १०७ आधार बिंदूंची वाढ झाली आहे. ग्रामीण भागात अन्नधान्य महागाई किंचित वाढली, ऑगस्टमध्ये ती (उणे) -०.७० टक्के झाली, जी जुलैमध्ये (उणे) -१.७४ टक्के होती. त्याचप्रमाणे, शहरी भागात ती ऑगस्टमध्ये (उणे) -०.५८ टक्के झाली, जी गेल्या महिन्याच्या याच कालावधीत (उणे) -१.९० टक्के होती. ग्रामीण भागातील महागाई दर जुलैमध्ये १.१८ टक्क्यांवरून १.६९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तर शहरी महागाई ऑगस्टमध्ये २.४७ टक्क्यांपर्यंत वाढली, जी गेल्या महिन्यात २.१० टक्के होती.
राज्यनिहाय किरकोळ महागाई
केरळमध्ये ऑगस्टमध्ये सर्वाधिक एकत्रित महागाई ९.०४ टक्के नोंदवली गेली, जी कर्नाटक (३.८१ टक्के) पेक्षा खूपच जास्त आहे, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर (३.७५ टक्के), पंजाब (३.५१ टक्के) आणि उत्तराखंड (२.९० टक्के) आहे.
क्षेत्रनिहाय महागाई
इतर क्षेत्रांमध्ये, आरोग्य महागाई सर्वाधिक ४.४० टक्के होती, जी जुलैमध्ये ४.५७ टक्क्यांवरून कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये गृहनिर्माण महागाई ३.०९ टक्के होती, जी जुलैमध्ये ३.१७ टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे. हा निर्देशांक फक्त शहरी भागांसाठी मोजला जातो. वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील महागाई जुलैमध्ये २.१२ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये १.९४ टक्क्यांपर्यंत कमी झाली. इंधन महागाई ऑगस्ट २०२५ मध्ये २.४३ टक्क्यांपर्यंत घसरली, जी जुलैमध्ये २.६७ टक्क्यांवरून कमी झाली.