नवी दिल्ली : नवी दिल्ली: देशाच्या सेवा क्षेत्राची सक्रियता सरलेल्या एप्रिलमध्ये महिनावार म्हणजेच मार्चच्या तुलनेत किंचित मंदावली असली तरी त्यातील विस्तारपूरकता कायम राहिली असून, तिने १४ वर्षांतील उच्चांकी स्तर गाठल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक एप्रिल महिन्यात ६०.८ गुणांवर नोंदला गेला. मार्चमध्ये हा गुणांक ६१.२ होता. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये सेवा क्षेत्रातील क्रियाकलापातील वाढीचा वेग मंदावला असला तरी त्याचा दर सकारात्मक आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते. हा निर्देशांक ऑगस्ट २०२१ पासून ५० गुणांवर नोंदविला गेला आहे.
हेही वाचा >>> बीएसएनएलच्या ४ जी सेवेला अखेर ऑगस्टचा मुहूर्त; पंजाबमधील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर देशभरात अनावरण
देशांतर्गत आणि परदेशी कार्यादेशातील वाढीमुळे सेवा व्यवसायांच्या चालकांचा आत्मविश्वास तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहे. जारपेठेतील पूरक स्थिती आणि कार्यादेशात झालेली वाढ यामुळे निर्देशांकाने एप्रिलमध्ये तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर फेर कायम राखला. ही गेल्या १४ वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाची उच्चांकी पातळी आहे. निर्देशांक मार्चच्या तुलनेत किरकोळ घसरला असला तरी सेवा क्षेत्राची वेगवान आगेकूच कायम राहिली आहे. व्यवसायाबद्दल सकारात्मकता वाढली असली तरी रोजगार निर्मितीच्या पातळीवर वाढ झालेली नाही, असेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय सेवा क्षेत्राची सक्रियता एप्रिल महिन्यात किंचित कमी झाली आहे. नवीन कार्यादेशांमुळे सेवा क्षेत्राचा वाढीचा वेग कायम राहिला आहे. देशांतर्गत कार्यादेशातही चांगली वाढ दिसून आली. – प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया