वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गेल्या चार महिन्यांपासून महागाईत घसरण सुरू आहे. मात्र मार्च महिन्यात ही घसरण थांबण्याची शक्यता असून, महागाईचा दर स्थिर राहील, असा अंदाज रॉयटर्सच्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे.

गेल्या चार महिन्यांत अन्नधान्याच्या भावात सातत्याने घसरण झालेली आहे. उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीला फटका बसल्याने मार्चमध्ये अन्नधान्याच्या भावातील घसरण थांबण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने ४० अर्थतज्ज्ञांचे सर्वेक्षण केले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये ३.६० टक्के राहील, असा अंदाज सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. त्याआधीच्या फेब्रुवारीत किरकोळ महागाईचा दर ३.६१ टक्के होता.

अन्नधान्याचे भाव स्थिर राहणार असले तरी सोन्याच्या भावातील वाढीमुळे महागाईच्या दरात घसरण होणार नाही. सोन्याच्या भावात मार्च महिन्यात ७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इतर देशांवर जशास तसे आयात शुल्क आकारले जात असल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. यामुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.

मार्चमध्ये महागाई दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. जानेवारी आणि मार्चच्या तुलनेत हे भाव कमी आहेत. सोन्याच्या भावातील वाढीमुळे महागाई दरातील घसरण रोखली जाणार आहे.

इंद्रनील पॅन, अर्थतज्ज्ञ, येस बँक

हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने भाज्या आणि फळांच्या भावावर परिणाम होणार आहे. आगामी काही महिन्यांत त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात होईल.

राहुल बजोरिया, बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्च