वृत्तसंस्था, बंगळूरु : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने सरासरी चल वेतन अर्थात व्हेरिएबल पे ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. जागतिक मंदी आणि अनिश्चिततेच्या बरोबरीने अमेरिकेतील बँकबुडीच्या संसर्गाच्या परिणामाने, माहिती-तंत्रज्ञान उद्योगावरील ताण आणि संकट अधिक गहिरे बनले असल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

कंपनीकडून मे महिन्याच्या पगारासह सुधारित चल वेतनाची रक्कम दिली जाईल. सरासरी चल वेतनाचे प्रमाण हे हाती पडणाऱ्या एकूण पगारात ६० टक्के इतके असून, कर्मचाऱ्यांचे अंतिम चल वेतन हे त्यांच्या विभागाच्या व्यावसायिक कामगिरीवर अवलंबून असेल आणि वेगवेगळ्या वेतनश्रेणी आणि विभागांसाठी ते वेगवेगळे आहे, असे कंपनीने स्पष्ट केले. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने चल वेतन ७० टक्क्यांपर्यंत खाली आणले होते, जे नंतर दुसऱ्या तिमाहीत ६५ टक्क्यांवर आणण्यात आले. त्यातील घसरणीचा कल कायम असून ते आता ६० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. इन्फोसिसपाठोपाठ इतर कंपन्यांकडूनदेखील कर्मचाऱ्यांच्या चल वेतनात कपात केली जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ हे एकंदरीत मजबूत कामगिरीचे वर्ष असताना, सरलेल्या तिमाहीतील अस्थिर बाजार आणि अनपेक्षित घटनांचा परिणाम झाला असून बाजारातील बदलांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, असे कंपनीने कर्मचाऱ्यांना ईमेलच्या संदेशाच्या माध्यमातून सूचित केले आहे. समूह म्हणून एकत्र येण्याची आणि बदलत्या व्यवसायाच्या कार्यपद्धतीनुसार स्वतःला बदलण्याची गरज असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सरलेल्या तिमाहीत वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात ७.८ टक्के वाढ नोंदवत ६,१२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘व्हेरिएबल’ वेतन म्हणजे?

‘व्हेरिएबल’ म्हणजे तुमच्या/ कंपनीच्या कामगिरीवर/ व्यावसायिक फायद्या-तोट्यावर अवलंबून असणारा पगार. व्हेरिएबल पगार म्हणजे वार्षिक बोनस/ सेल्स कमिशन भागांनी बनतो.