मुंबई: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिसने गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत १० कोटी समभागांच्या पुनर्खरेदीच्या (बायबॅक) योजनेला मंजुरी दिली. यावर १८,००० कोटी रुपये कंपनीकडून खर्च केले जाणार आहेत. प्रत्येकी १,८०० रुपये किमतीला प्रस्तावित ही पुनर्खरेदी म्हणजे इन्फोसिसच्या १,५१२ रुपये या गुरुवारच्या बंद भावाच्या तुलनेत भागधारकांना १९ टक्क्य़ांचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे.
इन्फोसिसकडून जाहीर करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी समभाग पुनर्खरेदी आहे.
यापूर्वी इन्फोसिसचा वर्ष २०२२ मध्ये समभाग पुर्नखरेदी योजना राबवली होती. त्यावेळी कंपनीने ९,३०० कोटी रुपयांचे समभाग पुर्नखरेदी केले होते, यासाठी प्रति समभाग १,८५० रुपये किंमत निश्चित केली होती. समभाग पुर्नखरेदी हा भागधारकांना भांडवल परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ज्यावेळी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या पुस्तकांवरील रोख रक्कम वाढते, त्यावेळी त्यांच्याकडून समभाग पुर्नखरेदीची योजना हाती घेऊन गुंतवणूकदारांना भरभरून फायदा देत असतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, टीसीएससारख्या कंपन्यांनी देखील अनेकदा समभाग पुर्नखरेदीची राबवून गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे.
पहिल्या तिमाहीचे निकाल
इन्फोसिसने सरलेल्या जून तिमाहीत ६,९२१ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. त्यात ८.७ टक्के वाढ नोंदवली. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीने ६,३६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.
समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय? एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात.