बेंगळुरू : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने गेल्या पाच आर्थिक वर्षांच्या कालावधीत भागधारकांना १.१ लाख कोटींनी (१२.८ अब्ज डॉलर) श्रीमंत केले आहे. कंपनीने लाभांश, बक्षीस समभाग आणि समभाग पुनर्खरेदीच्या माध्यमातून भागधारकांना आतापर्यंत धनलाभ करून दिला आहे.
कंपनीने जून २०१८ पासून एकूण १५ वेळेला लाभांश, विशेष लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांच्या पदरी आतापर्यंत ८०,००० कोटी रुपये दिले आहेत. यानुसार वर्षाला सरासरी तीनदा लाभांश वाटप करण्यात आले आहे. समजा गुंतवणूकदाराने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये समभागांची खरेदी केली असती, तर आतापर्यंत म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेर त्याला प्रतिसमभाग सरासरी ३७७.५० रुपयांचा लाभांश प्राप्त झाला असता.
हेही वाचा >>> ‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
ऑगस्ट २०१९, ऑक्टोबर २०२१ आणि फेब्रुवारी २०२३ या तीन वर्षात समभाग पुनर्खरेदी अर्थात ‘बायबॅक’च्या माध्यमातून कंपनीने भागधारकांकडून २६,८०० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. शिवाय सप्टेंबर २०१८ मध्ये कंपनीने एकास एक (१:१) बक्षीस समभाग जाहीर केला होता. म्हणजेच कंपनीने गेल्या पाच वर्षात लाभांश आणि समभाग पुनर्खरेदीच्या माध्यमातून भागधारकांना १.१ लाख कोटींचा धनलाभ पोहोचवला आहे.
नारायण मूर्तींच्या नातवाला ४.२ कोटींचा लाभांश
इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या नातवाला २४० कोटी रुपये मूल्याचे १५ लाख समभाग भेट दिले होते. कंपनीने मार्चअखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने २० रुपयांचा अंतिम लाभांश आणि ८ रुपयांच्या विशेष लाभांश जाहीर केल्यामुळे त्यांच्या पाच महिन्यांच्या नातवाला ४.२ कोटी रुपयांचे लाभांश उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामुळे पाच महिन्यांचा तो भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा सर्वात तरुण कोट्यधीश भागधारक बनला होता.