वाद्ये खरे तर काही गुंतवणुकीसाठी नसतात. कारण भारतासारख्या देशात जिथे संगीताची खूप मोठी परंपरा आहे, तिथे संगीत वाद्यात गुंतवणूक हा विचारच होऊ शकत नाही. संगीत, वाद्य यात आपली भावनिक गुंतवणूक. पण तरीही हौशी कलाकारांनी या गुंतवणुकीचा नक्कीच विचार करायला हवा. वाद्ये सर्वच सामान्य लोक वापरतात असे देखील नाही. यामुळे अशा वाद्यांना कुठल्यातरी मोठ्या कलाकाराचा परिसस्पर्श लाभलेला असतो. वाद्ये बनताना ती मोठ्या प्रमाणावर बनवली जात नाहीत.
अत्यंत मर्यादित स्वरूपात वाद्ये बनवली जातात. दिवसेंदिवस पारंपरिक वाद्ये तयार करणे कारागीर देखील कमी होत आहेत. प्राण्याच्या कातडीपासून, शिंगांपासून, हाडापासून, बांबू वापरून किंवा कुठल्या तरी अशा प्रदेशात म्हणजे तेथील हवामान ते वाद्य बनण्यासाठी अनुकूल असते. म्हणून अशी वाद्ये परत नवीन तयार करणे जवळजवळ अशक्य असते. ती वाद्ये दुर्मीळ असल्याने त्याची किंमत निश्चित वाढतच जाते.
परदेशात तर व्हायोलिनला जणू काही सोन्याचीच किंमत असते. जुने व्हायोलिन लिलावात विकणे आणि विकत घेणे हे आज देखील प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. न्यूयॉर्कमध्ये व्हायोलिनचे चक्क एक संग्रहालय आहे, जिथे कित्येक जुनी व्हायोलिन ठेवण्यात आली आहेत. जुन्या वाद्यांचा कुणी गुंतवणूक म्हणून विचार करत नाही आणि त्यामुळे त्या विषयीचे संशोधनसुद्धा अतिशय कमी आहे. भारतासारख्या संगीतप्रिय देशात तर अशा वाद्यांची अजिबात कमी नाही. जुन्या भारतीय संस्कृतीत कित्येक अशी वाद्ये बनवली गेली आहेत आणि आता ती बनत देखील नाही.
प्रत्येक राज्याची वेगळीवेगळी संस्कृती आहे. याझ (दक्षिण भारत) , पिपा (आसाम), अलगोझा (राजस्थान) इत्यादी वाद्ये आता मिळत देखील नाहीत. त्यांना एक निश्चित किंमत आहे आणि काळाच्या ओघात ती नक्की वाढणार आहे. जुनी वाद्ये विकणारी काही संकेतस्थळे देखील आहेत. तिथे गेलात तर तुम्हाला जुन्या वाद्यांची किंमत कळते. अगदी जुन्या झान्झापासून कधीही न बघितलेली वाद्ये देखील दिसतात. जुने ग्रामोफोन, वीणा वाद्ये, श्रुतीच्या पेट्या, ग्लास हार्मोनिका तर अजून काही वर्षांनी मिळणार नाहीत. अर्थात ही गुंतवणूक देखील काही पुरातन वस्तूंचा कायदा किंवा प्राप्तिकराच्या जाळ्यापासून मुक्त नाही. कारण तुमच्या भावना जरी असल्या तरी कायद्याला मात्र भावभावना नसतात.