अर्थसंवाहक अर्थात सेमीकंडक्टर प्रकल्प थाटण्यासाठी तीन प्रस्ताव आले असून, त्यामुळे या उद्योगातील एकूण गुंतवणूक १ लाख कोटी रुपयांवर (८ ते १२ अब्ज डॉलर) जाणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने या उद्योग क्षेत्रासाठी सुरू केलेल्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) आगामी काही महिन्यांत ही गुंतवणूक येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी येथे दिली.
एएमडी या कंपनीने बंगळूरुमध्ये डिझाइन सेंटर सुरू केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी एएमडी इंडियाचे प्रमुख जया जगदीश यांनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी वैष्णव म्हणाले, ‘आगामी काही महिन्यांत आणखी तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची माहिती मी तुम्हाला देईन. देशात सेमीकंडक्टर उद्योगात अत्याधुनिक फॅब्रिकेटिंग तंत्रज्ञान या प्रकल्पांमुळे येणार आहे. आमचा उद्देश या उद्योगासाठी परिसंस्था तयार करण्याचा आहे. पहिले काही प्रकल्प योग्य पद्धतीने कार्यान्वित व्हावेत, याची काळजी आम्ही घेत आहेत. त्यानंतर या उद्योगाचा भारताबद्दल आत्मविश्वास वाढून त्यात आणखी विस्तार होईल.’