मुंबई : सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’ म्हणजे कंपनीतील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांसाठी नफ्यासह बाहेर पडण्याचा मार्ग (एग्झिट व्हेईकल) बनल्या आहेत आणि हा ताजा प्रवाह प्राथमिक बाजाराच्या सार्वजनिक भावनेला कमकुवत बनवत आहे, असे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सोमवारी येथे खेदपूर्वक नमूद केले.

भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना नागेश्वरन पुढे म्हणाले की, देशातील भांडवली बाजार केवळ संख्यात्मक प्रमाणातच नव्हे, तर ‘प्रयोजना’ने देखील विकसित होणे गरजेचे आहे.

बाजार भांडवल फुगत जाणे किंवा डेरिव्हेटिव्ह व्यापाराच्या प्रमाणात वाढीचे उच्चांकी टप्पे आपल्या बाजारांनी गाठणे यासारख्या गोष्टी हर्षोल्हासाने साजरा करण्यासारख्या नाहीत. अशा चुकीच्या मापदंडांना साजरे करण्यापासून सावध राहण्याचे नागेश्वरन यांनी आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, ही ‘आर्थिक सुसंस्कृतपणा’ची लक्षणे नाहीत आणि त्याबद्दल आनंदोत्सवाचा प्रयत्न हा देशांतर्गत बचत ही उत्पादक गुंतवणुकीपासून दूर नेण्याचा धोका दर्शवितो.

भारताने एक मजबूत आणि अत्याधुनिक भांडवल बाजार विकसित करण्यात यश मिळवले आहे, असे म्हटले जाते. भारताच्या शेअर बाजारांमध्ये प्रभावी वाढ झाली आहे, परंतु प्रारंभिक सार्वजनिक भागविकी (आयपीओ) हे दीर्घकालीन भांडवल उभारणीचे माध्यम असण्याऐवजी, कंपनीतील प्रस्थापित आणि प्रारंभीच्या गुंतवणूकदारांना रग्गड नफ्यासह बाहेर पडण्याचे (एग्झिट व्हेईकल) फायदेशीर मार्ग बनले आहेत. यामुळे बाजाराच्या सार्वजनिक भावनेला धक्का बसतो, असे नागेश्वरन यांनी नमूद केले.

चालू वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत ५५ भारतीय कंपन्यांनी त्यांचे ‘आयपीओ’ आणले. ज्यातून जवळजवळ ६५,००० कोटी रुपये उभारले गेले आहेत. मात्र बहुतांश आयपीओचे स्वरूप हे कंपनीतील विद्यमान गुंतवणूकदारांच्या हाती असलेल्या समभागांच्या विक्रीसाठी होते. त्याउलट ज्यामुळे कंपनीला व्यवसाय विस्तारासाठी निधी मिळतो अशा नवीन समभागांच्या विक्रीचे प्रमाण खूपच कमी होते

दीर्घकालीन उद्दिष्टांना वित्तपुरवठा करण्यासाठी केवळ बँकांच्या कर्जांवर अवलंबून राहता येणार नाही, असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, देशातील उद्योग क्षेत्राला दीर्घ पल्ल्याचा वित्तपुरवठा मिळविण्यासाठी सखोल रोखे बाजाराकडे रणनीतिक गरज म्हणून पाहिले जायला हवे.

भारताच्या खासगी क्षेत्रातून महत्त्वाकांक्षा दिसून येण्याची गरज आहे. त्यांनी जोखीम घेण्याची आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज आहे. हे चालू वर्षाच्या काळात घडत असल्याचे आढळून येत आहे. मात्र येत्या काही वर्षांत आपण जगातील सर्वात मोठ्या अर्थसत्तांपैकी एक बनू इच्छित असताना त्यात सातत्य दिसून यायला हवे. अर्थव्यवस्थेच्या आकारमानानुसार धोरणात्मक फायदा निर्माण करण्याची तुमची गरज अशाच स्वरूपात व्यक्त केली जायला हवी, असे त्यांनी सूचित केले.