मुंबई: चालू वर्षात मंद सुरुवातीनंतर, कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’ बाजारपेठ पुन्हा रुळावर येत आहे. चालू आठवड्यात सहा कंपन्या एकत्रितपणे ११,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या माध्यमातून उभारणार असून, त्यापैकी बोराना वीव्हजची विक्री मंगळवारपासून सुरू होत असून, ही कंपनी १४५ कोटी रुपये उभारू पाहत आहे, तर पुण्यातील बेलराईज इंडस्ट्रीजची २,१५० कोटी रुपयांची भागविक्री बुधवार, २१ मे रोजी खुली होत आहे.

उर्वरित चार कंपन्या – लीला पॅलेसेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चालवणारी स्क्लॉस बंगलोर लिमिटेड (३,००० कोटी), एजिस व्होपॅक टर्मिनल्स (३,५०० कोटी), एरिसइन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड (६०० कोटी) आणि स्कोडा ट्यूब्स (२७५ कोटी) पुढील आठवड्यात त्यांचे आयपीओ दाखल करण्याची अपेक्षा आहे. या सहा कंपन्यांकडून एकत्रितपणे ११,६६९ कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. वर्षारंभीच्या अस्थिरतेमुळे २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त १० कंपन्या त्यांचे ‘आयपीओ’ घेऊन आल्याने प्राथमिक बाजारपेठेत मंदी होती. तर २०२४ मध्ये तब्बल ९१ सार्वजनिक भागविक्रीतून एकत्रितपणे १.६ लाख कोटी रुपये उभारले गेले आहेत.

बोराना वीव्हज लिमिटेड

कृत्रिम (सिथेंटिक) कापडाच्या निर्मितीचे केंद्र असलेल्या सुरतस्थित या उद्योगातील प्रमुख कंपनी बोराना वीव्हज लिमिटेडने आपल्या चौथ्या उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेच्या उद्देशाने प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. प्रत्येकी २०५ रुपये ते २१६ रुपये किमतीला मंगळवार २० मे ते गुरुवार २२ मे असे तीन दिवस सुरू राहणाऱ्या या समभाग विक्रीतून कंपनीला १४४.८९ कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे.

तब्बल ७०० अत्याधुनिक यंत्रमागांद्वारे वेगवेगळ्या तीन प्रकल्पांतून बोराना वीव्हज लिमिटेडकडून प्रति वर्ष २,३३३ लाख मीटर सिंथेटिक ग्रे फॅब्रिक या कृत्रिम कापडाची निर्मिती केली जाते. ज्याचा वापर पारंपरिक वस्त्रोद्योग, फॅशन, टेक्निकल टेक्स्टाइल, गृह सजावट वगैरे उद्योगांकडून केला जातो. कंपनीचे तिन्ही प्रकल्प सरासरी ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने कार्यरत असून, वाढती मागणी पाहता चौथा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल, असे कंपनीचे कार्यकारी संचालक राजकुमार बोराना म्हणाले.

आयपीओतून उभारल्या जाणाऱ्या १४५ कोटींपैकी ७१.३१ कोटी रुपये हे चौथ्या प्रकल्पासाठी भांडवली खर्च म्हणून वापरात येतील, तर २६ कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी वापरले जातील. चौथ्या प्रकल्पाच्या कार्यान्वयनातून एकूण यंत्रमाग क्षमता १,०५० इतकी होईल आणि उत्पादन क्षमतेतही ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. खर्चात कपातीसाठी कंपनीचे १० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचेही नियोजन आहे.

बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड

वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मात्री बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ‘आयपीओ’ २१ मेपासून तीन दिवस म्हणजे २३ मेपर्यंत खुला असेल. या माध्यमातून २,१५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य असून, यासाठी प्रति समभाग ८५ रुपये ते ९० रुपये किंमतपट्टा तिने निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदार किमान १६६ समभाग आणि त्यानंतर १६६ समभागांच्या पटीत बोली लावू शकतील. आयपीओतून मिळणाऱ्या निधीपैकी १,६१८ कोटी रुपयांच्या रकमेचा वापर कर्ज परतफेडीसाठी केला जाणार आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत कंपनीवरील कर्जाचे प्रमाण सुमारे २,६०० कोटी रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेलराईज इंडस्ट्रीज ही प्रामुख्याने दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, वाणिज्य वापराची वाहने आणि कृषी वाहनांसाठी विविध सुट्या घटकांचे उत्पादन करते. तिची उत्पादने ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन, जपान आणि थायलंडसह अनेक बाजारपेठांमध्ये वितरित होतात. देशांतर्गत आघाडीवर बजाज ऑटो, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, हीरो मोटोकॉर्प, जग्वार लँड रोव्हर आणि रॉयल एनफील्ड मोटर्स सारख्या प्रमुख कंपन्या तिच्या ग्राहक आहेत. डिसेंबर २०२४ पर्यंत १० राज्यांमध्ये तिचे १७ उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत.