पीटीआय, नवी दिल्ली
ऐंशीच्या दशकात सिनेमागृहांमध्ये नमकिन अल्पोपहारासाठी प्रसिद्ध बालाजी वेफर्सचे प्रवर्तक त्यांचा १०-१५ टक्के हिस्सा विक्रीला काढणार असून, तो खरेदी करण्यासाठी आयटीसी फूड्ससह डझनभराहून अधिक कंपन्या शर्यतीत असल्याचे या क्षेत्रातील सूत्रांनी मंंगळवारी सूचित केले.
हल्दीराममध्ये अलीकडेच १० टक्के हिस्सा खरेदी करणाऱ्या टेमासेक पीई फर्म्स, टीपीजी, एडीआयए (अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी) आणि सुमारे १० इतर फंड हे बालाजी वेफर्समध्ये देखील हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रवर्तकांशी चर्चा करत आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांव्यतिरिक्त, आयटीसी फूड्स देखील राजकोट, गुजरातस्थित या कंपनीमध्ये हिस्सा खरेदीसाठी प्रयत्नरत आहे. आयटीसी फूड्सची मध्य आणि पश्चिम भारतातील चिप्स, नमकीन आणि कन्फेक्शनरी उत्पादनांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. यामुळे आयटीसी समूहाचा भाग असलेली आयटीसी फूड्स या व्यवहारातील संभाव्य प्रमुख दावेदार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवर्तक विराणी बंधू हे १० ते १५ टक्के हिस्सा विक्री करू इच्छित आहेत. कंपनीचे मूल्यांकन सुमारे ३.५-४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात जाणारे आहे. परंतु प्रवर्तकांना मूल्यांकनात सुमारे ५ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४४ हजार कोटी रुपयांची अपेक्षा आहे. प्रवर्तक अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे, ब्लॅकस्टोन आणि केकेआर सारख्या मोठ्या खासगी भांडवली गुंतवणूक कंपन्यांची मात्र यात उत्सुकता दिसून आलेली नाही.
बालाजी वेफर्सची स्थापना विराणी बंधू – चंदूभाई, कनुभाई आणि भिखुभाई यांनी केली होती. ऐंशीच्या दशकात सिनेमा कॅन्टीनमध्ये प्रीपॅकेज केलेले स्नॅक्स विकून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी नंतर घरी स्वतःचे बटाटा वेफर्स आणि नमकीन स्नॅक्स बनवण्यास सुरुवात केली. सध्या ६५ हून अधिक उत्पादन ठेवण्याची गोदामे आणि जवळपास १,३०० वितरक असलेल्या या कंपनीने २०२३ मध्ये ५,००० कोटी रुपयांच्या विक्री महसुलाचा टप्पा ओलांडला आहे. उपलब्ध तपशिलानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बालाजी वेफर्सचा महसूल ५,४५३.७ कोटी रुपये आणि नफा ५७८.८ कोटी रुपयांचा होता.
मार्च २०२५ मध्ये, देशातील सर्वात मोठी पॅकेज्ड स्नॅक आणि स्वीट्स कंपनी हल्दीरामने तीन धोरणात्मक गुंतवणूकदारांसोबत भागीदारीची घोषणा केली. यामध्ये सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली जागतिक गुंतवणूकदार संस्था टेमासेक, अल्फा वेव्ह ग्लोबल आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीचा समावेश आहे.