पीटीआय, कोलकाता

ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील आघाडीच्या आयटीसी लिमिटेडने तिच्या समूहातील विविध व्यवसायांच्या विस्तारावर २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. विविध व्यवसायांची उत्पादन क्षमता मजबूत करताना, उदयोन्मुख क्षेत्रांना चालना देण्यासाठी गुंतवणुकीची योजना आखली जात आहे, असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी शुक्रवारी सांगितले.

कंपनीने अलिकडच्या काळात आठ जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्याचा खर्च सुमारे ४,५०० कोटी रुपये आहे, असे पुरी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले. व्यवसायात नवीन क्षितिजे गाठली जात असताना, आयटीसीने मध्यम कालावधीत २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे, असे पुरी यांनी अधिक तपशील न देता नमूद केले. यापूर्वी २०२४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या भाषणात अशीच गुंतवणूक योजना जाहीर केली होती.

समूहाची गुंतवणूक ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), पॅकेजिंग आणि निर्यातकेंद्रित मूल्यवर्धित कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित भांडवली खर्चासाठी विशिष्ट वेळापत्रक निश्चित केले नसले तरी गुंतवणूक कंपनीच्या ‘आयटीसी नेक्स्ट’ धोरणाशी जुळणाऱ्या क्षेत्रांमध्ये केली जाईल, असे पुरी यांनी सांगितले.

आयटीसी नेक्स्ट, भारत फर्स्ट !

कंपनीने ४० अत्याधुनिक उत्पादन मालमत्ता तयार केल्या आहेत, ज्यामुळे आयटीसीचे २५० उत्पादन प्रकल्प आणि ७,५०० लघुउद्योजकांची (एमएसएमईं) मजबूत परिसंस्था उभी राहिली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत आयटीसीचे योगदान वाढते आहे. कंपनीच्या जागतिक महत्त्वाकांक्षा मजबूत देशांतर्गत पायावर आधारित आहेत. ‘भारत फर्स्ट’ हा कंपनीला लाभलेला वारसा असल्याचे सांगत पुरी म्हणाले, ‘भारतीय ब्रँड्सनी जागतिक व्यासपीठावर स्थान मिळवले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रभाव पाडण्यापूर्वी प्रथम भारतात एक शाश्वत वारसा स्थापित केला गेला पाहिजे. ‘आयटीसी नेक्स्ट’ रणनीतीद्वारे कंपनीची फूड-टेक व्यवसायाची कल्पना आहे. ज्यातून खाद्यपदार्थ, हॉटेल्स आणि डिजिटल तंत्रज्ञानातील ताकदीचा वापर करून, कंपनी वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन खाद्य सेवा क्षेत्रात आघाडीच्या स्थानावर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटीसीचा विस्तार किती?

आयटीसीचा ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन भांडार सध्या ३४,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तिची उपस्थिती आहे. भारतातील २६ कोटींहून अधिक घरांमध्ये तिची उत्पादने विकली जातात. कंपनीने आरोग्य आणि पोषण, स्वच्छता, नैसर्गिक उत्पादने अशा श्रेणींमध्ये १०० हून अधिक नवीन उत्पादने सादर केली आहेत, तर २४ मंत्रा ऑरगॅनिक, प्रसुमा, योगा बार आणि मदर स्पर्श सारख्या मूल्य-संवर्धित नाममुद्रांचे अधिग्रहण केले आहे. ज्यात गतिमान ग्राहकांच्या पसंती पूर्ण करण्यासाठी नवोपक्रमाला सतत प्राधान्य दिले गेले आहे.