Amazon Founder: अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस कंपनीतील सुमारे ४.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स (४०,१७३ कोटी रुपये) किमतीचा हिस्सा विकण्याची योजना आखत आहेत. बेझोस यावेळी सुमारे २.५ कोटी शेअर्स विकणार आहेत. ते २९ मे २०२६ रोजी संपणाऱ्या एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत ते हे शेअर्स विकण्याची योजना आखत आहेत. ही माहिती एक्सचेंज फाइलिंगमधून आली आहे. याबाबत सीएनबीसीने वृत्त दिले आहे.
यापूर्वी, बेझोस यांनी २०२४ मध्ये १३.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे शेअर्स विकले होते. या शेअर विक्रीतून मिळालेल्या रकमेचा बहुतांश भाग त्यांनी त्यांच्या अवकाश संशोधन कंपनी, ब्लू ओरिजिनला निधी देण्यासाठी वापरला आहे. जरी या उपक्रमाचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात गुप्त असले तरी, अंतर्गत सूत्रांचा अंदाज आहे की, त्याचा वार्षिक खर्च २ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
मस्क यांच्यानंतर जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होऊनही बेझोस अमेझॉनमध्ये एक प्रमुख भागधारक आहेत. फोर्ब्सच्या मते, बेझोस सध्या एकूण २०६.७ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत. एलॉन मस्क नंतर ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्गच्या मते, बेझोस यांची एकूण संपत्ती सध्या २१२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
अमेझॉनचे तिमाही निकाल जाहीर
गुरुवारी, १ मे रोजी अमेझॉनचे तिमाही निकाल जाहीर झाले. जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत कंपनीने १५५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा निव्वळ नफा नोंदवला आहे. अमेझॉन ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे. त्याचे बाजार भांडवल अंदाजे २.०१६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीचे शेअर्स ५.८० अमेरिकन डॉलर्स किंवा २.९६ टक्क्यांनी घसरले आहेत.
व्हाईट हाऊसच्या आरोपांवर अमेझॉनची प्रतिक्रिया
एप्रिलच्या सुरुवातीला, अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क जाहीर केल्यानंतर, विशेषतः चिनी आयातींवर, अमेझॉनच्या ऑनलाइन शॉपिंग साईटवरील किमती वाढू लागल्या.
गेल्या आठवड्यात, व्हाईट हाऊसने अमेझॉनवर “विरोधी आणि राजकीय कृत्य” केल्याचा आरोप केला होता, असे वृत्त समोर आल्यानंतर कंपनी खरेदी करताना ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काच्या संभाव्य खर्चाबद्दल ग्राहकांना सूचित करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आले होते. मात्र, कंपनीने हे वृत्त नाकारले होते.