मुंबई : देशातील सर्वाधिक वेतनमान आणि प्रतिष्ठित अशा ‘व्हाईट कॉलर’ नोकऱ्यांमध्ये आतापर्यंत देशातील सॉफ्टवेअर आणि माहिती-तंत्रज्ञान (आयटी) सेवांचा वरचा क्रमांक आता धोक्यात असल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाने सूचित केले. मू‌ळात रोजगार वाढीचे चित्र फारसे आशादायी नाही आणि जी काही वाढ आहे त्यात बिगर-आयटी क्षेत्र आघाडीवर आहेत.

ऑगस्ट महिन्यात ‘व्हाईट कॉलर’ नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्के वाढ झालेली आहे. कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशिन लर्निंग (एमएल) यासारख्या बिगर माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातून रोजगार निर्मितीत सर्वाधिक वाढ झाल्याचे ‘नोकरी जॉबस्पीक’च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.

व्हाईट कॉलरमध्ये प्रामुख्याने व्यवस्थापकीय व प्रशासकीय भूमिका असलेल्या आणि विशेष कौशल्ये व उच्च शिक्षणाची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांचा समावेश असतो. नोकरीचा शोध आणि भरतीचे लोकप्रिय ऑनलाइन संकेतस्थळ नोकरी डॉट कॉमचा मासिक रोजगार निर्देशांक म्हणून ‘नोकरी जॉबस्पीक’कडे पाहिले जाते. त्यानुसार, एआय आणि मशिन लर्निंग क्षेत्रातील नोकर भरतीत गेल्या महिन्यात ५४ टक्के वाढ झाली आहे.

या नवोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्ये असलेल्या गुणवत्तेला मोठी मागणी दिसून येत आहे. विमा क्षेत्रातील नोकर भरतीत २४ टक्के वाढ झाली आहे. इतर क्षेत्रांमध्ये सकारात्मक वाढ नोंदविण्यात आली असून, त्यात आदरातिथ्य २२ टक्के, बांधकाम १८ टक्के, बीपीओ/आयटी संलग्न सेवा १७ टक्के, शिक्षण १६ टक्के, तेल व नैसर्गिक वायू ७ टक्के, रिटेल ३ टक्के आणि एफएमसीजी २ टक्के अशी वाढ झाली आहे.

बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील नोकर भरतीत ११ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. तसेच, आयटी/सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकर भरतीत ६ टक्के घट झाली आहे. याचबरोबर दूरसंचार/ इंटरनेट सेवा पुरवठादार १३ टक्के आणि वाहन निर्मिती क्षेत्रात ३ टक्के घट झाली आहे. नवीन उमेदवारांच्या भरतीत ७ टक्के वाढ झाली असून, त्यात आदरातिथ्य, बांधकाम आणि शिक्षण या बिगरआयटी क्षेत्रांचा समावेश आहे. हैदराबादमध्ये सर्वाधिक नोकर भऱती झाली असून, तेथील वाढ १० टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.

‘स्टार्टअप्स’कडून सर्वाधिक भरती

मुख्यत्वे बिगर-आयटी क्षेत्रातील रोजगारांमधील वाढ ही एकूणच रोजगार निर्मितीतील वाढीस कारणीभूत ठरली आहे. गेल्या काही महिन्यांत हे चित्र दिसून येत आहे. नवउद्यमींकडून (स्टार्टअप्स) रोजगार निर्मिती होण्यात हैदराबाद आघाडीवर आहे. यामुळे देशातील महानगरांमध्ये रोजगार निर्मितीतही हैदराबादचे अग्रस्थान आहे, असे नोकरी डॉट कॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी, पवन गोयल म्हणाले.