नवी दिल्लीः देशातील निर्मिती क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे, सरलेल्या जुलैमध्ये भारताचा औद्योगिक उत्पादनांतील वाढ चार महिन्यांच्या उच्चांकी ३.५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचली आहे, असे गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.
देशातील कारखानदारीचे आरोग्यमान दर्शविणाऱ्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग आधीच्या जून महिन्यांत अवघा १.५ टक्क्यांवर होता, तर गतवर्षी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये ते पाच टक्क्यांनी वाढले होते. यापूर्वी मार्च २०२५ मध्ये त्यात ३.९ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) प्रसिद्धीस दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलै २०२५ मध्ये निर्मिती/ उत्पादन क्षेत्रात ५.४ टक्क्यांची वाढ दिसून आली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.७ टक्क्यांपेक्षा अधिक राहिली आहे. या उलट खाण उत्पादनात ७.२ टक्क्यांनी घट झाली, जे गेल्या वर्षी जुलैमध्ये ३.८ टक्क्यांनी वाढले होते. वीज उत्पादनातही केवळ ०.६ टक्क्यांनी वाढ झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ७.९ टक्के होती.
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत, देशाचे एकूण औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षीच्या ५.४ टक्क्यांच्या तुलनेत यंदा केवळ २.३ टक्क्यांनी वाढले आहे.
आकडेवारीवर भाष्य करताना पतमानांकन संस्था ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या की, निर्मिती क्षेत्राची वाढ ५.४ टक्के अशी सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली हे उत्साहदायी आहे. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये या क्षेत्रात ५.८ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. बरोबरीने बांधकाम सामग्री आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील वाढीनेही मदतीचा हात दिला.
सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक सुधारणा दिसत असली तरी, खाणकाम आणि वीज क्षेत्रांची कामगिरी कमकुवत राहिली. या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम काहीसा कमी झाला, ज्याचा एकूण आयआयपी वाढीवरही सकारात्मक परिणाम दिसून आला, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तथापि गेल्या काही आठवड्यांमध्ये काही प्रदेशांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ऑगस्ट २०२५ मध्ये ‘आयआयपी’ वाढ ३ टक्क्यांपेक्षा कमी दिसू शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
जुलै २०२५ मध्ये निर्मिती/ उत्पादन क्षेत्रातील २३ पैकी १४ उद्योग गटांनी वार्षिक आधारावर सकारात्मक वाढ नोंदवली आहे. वापरानुरूप वर्गीकरणानुसार, भांडवली वस्तू क्षेत्राची वाढ जुलै २०२५ मध्ये मागील वर्षीच्या ११.७ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी झाली. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंतील वाढ जुलै २०२४ मध्ये ८.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत यंदा ७.७ टक्क्यांपर्यंत मंदावली. हे यातील घसरण दर्शविणारे उद्योग गट होते.
पायाभूत सुविधा/बांधकाम क्षेत्रात जुलै २०२५ मध्ये ११.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ५.५ टक्क्यांनी वाढली होती.