कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एनव्हिडिया’चे बाजार मूल्य ५ लाख कोटी डॉलरवर (५ ट्रिलियन डॉलर) झेपावले आहे. तिने तिचाच पूर्वीचा ४ ट्रिलियन डॉलरचा विक्रम मोडीत काढला आहे. याबरोबरच जगातील महाकाय कंपन्या असलेल्या ॲपल, मायक्रोसॉफ्टच्या बाजारभांडवलाने देखील नुकताच ४ लाख कोटी डॉलरचा (४ ट्रिलियन डॉलर) टप्पा ओलांडला आहे. विद्यमान २०२५ मध्ये एनव्हीडियाचे समभाग मूल्य ५० टक्क्यांनी वधारले आहे. तर तीन महिन्यात ४ ट्रिलियन डॉलरवरून ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला आहे.
अमेरिकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘एनव्हिडिया’च्या समभागांमध्ये वाढ झाल्याने तिचे बाजार भांडवल ५ लाख कोटी डॉलरवर झेपावले आहे. तिचा शेअर बुधवारच्या सत्रात ४.५ टक्क्यांनी वाढून २०९ डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. कृत्रिम प्रज्ञेला वाढती मागणी आणि कंपनीच्या उच्च-कार्यक्षमता चिप्स या तांत्रिक प्रगतीचा कणा आहेत. एआयच्या वाढत्या क्षमतेबद्दलच्या उत्साहामुळे आणि ओपनएआय, ओरॅकलपासून नोकिया आणि औषध निर्माता एली लिलीपर्यंत मोठ्या कंपन्यांशी झालेल्या करार आणि भागीदारीमुळे या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
‘एनव्हिडिया’चे मुख्याधिकारी जेन्सेन हुआंग यांनी ‘एनव्हिडिया’ला ५०० अब्ज डॉलरच्या एआय चिप कार्यादेशाची अपेक्षा आहे आणि अमेरिकी सरकारसाठी सात नवीन सुपरकॉम्प्युटर तयार करण्याची योजना जाहीर केल्यानंतर लगेचच ही नवीनतम वाढ झाली आहे. याबरोबरच नोकियासह १ अब्ज डॉलरची भागीदारी आणि पुढील पिढीतील ६जी सेल्युलर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नेटवर्किंग कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी करणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, एनव्हीडिया, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल हे भारत, फ्रान्स, ब्राझील, इटली आणि कॅनडा देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. या महाकाय जागतिक विस्तार असलेल्या तिन्ही कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या निरंतर चढाओढ सुरू आहे. अलीकडच्या काही दिवसांत मायक्रोसॉफ्टने ॲपलला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते आता गेल्या वर्षपासून एनव्हिडियाने ते हिरावून घेतले आहे.
