पीटीआय, नवी दिल्ली

वाहननिर्मिती क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडियाने २०३०-३१ पर्यंत आखलेल्या विस्तार कार्यक्रमावरील भांडवली खर्च १.२५ लाख कोटी रुपयांवर नेण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनीकडून वाहनांच्या १७ मॉडेलचे उत्पादन घेतले जात असून, भविष्यात ही संख्या २८ वर नेण्यात येणार असून, उत्पादन क्षमतेतही विस्ताराचा मानस आहे.

मारुती सुझुकी इंडिया ही देशातील सर्वांत मोठी मोटार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने वार्षिक उत्पादन क्षमता २०३०-३१ पर्यंत ४० लाखांवर नेण्यासाठी भांडवली खर्च वाढविण्याचे पाऊल उचलले आहे. कंपनीने भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम, मानेसर आणि गुजरातमधील सध्याच्या उत्पादन प्रकल्पांवर नियमित भांडवली खर्च सुरू असेल. तथापि मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७,५०० कोटी रुपये असलेला विस्ताररूपी भांडवली खर्च २०३०-३१ पर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांवर जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने भागधारक, विश्लेषक आणि गुंतवणूकदारांसमोर केलेल्या सादरीकरणात म्हटले आहे की, उत्पादन क्षमता २० लाखांवर नेण्यासाठी कंपनीला ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. देशांतर्गत मोटार विक्री दुपटीने वाढविण्यात येणार असून, त्यासाठी विक्री, सेवा आणि सुट्या भागांसाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. यासाठी कंपनीला निधीची आवश्यकता भासेल. संशोधन व विकास कार्यक्रमावरही अतिरिक्त तरतूद करावी लागेल. विविध प्रकारच्या इंधनांवर चालणारी नवीन १० ते ११ मॉडेल विकसित करण्याचा कंपनीचा मानस असून, त्यासाठीही भांडवली खर्च केला जाईल.