मुंबईः मिरॅ ॲसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सला बाजार नियामक सेबीने नाविन्यपूर्ण आणि विशेषीकृत गुंतवणूक योजना (स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड – एसआयएफ) दाखल करण्यास मंजुरी दिली असून, लवकरच दाखल होऊ घातलेल्या योजनांसाठी कंपनीने ‘प्लॅटिनम’ ही नवीन नाममुद्रा स्वीकारत असल्याचे गुरुवारी जाहीर केले.

सेबीने विशेषीकृत योजना – ‘एसआयएफ’ म्हणून सात गुंतवणूक धोरणांवर आधारीत प्रवर्गांना मान्यता दिली आहे, त्यापैकी समभागसंलग्न प्रवर्गात मोडणाऱ्या तीन योजनांना मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाने विचारात घेतले असून, ‘इक्विटी लाँग शॉर्ट एसआयएफ’ पुढील काही दिवसांत गुंतवणूकदारांपुढे प्रस्तुतही होईल, असे मिरॅ ॲसेट एएमसीचे उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी स्वरूप आनंद मोहंती म्हणाले. किमान १० लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असणाऱ्या या योजना अत्युच्च जोखीम आणि अत्युच्च परतावा या गटात मोडणाऱ्या आहेत. वर्षभराच्या अवधीत ‘एसआयएफ’च्या हायब्रिड आणि निश्चित उत्पन्न या अन्य प्रवर्गांमध्ये नवीन उत्पादने आणण्याची शक्यताही तपासून बघितली जाईल, असे मोहंती यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण कोरियातील जागतिक वित्तीय समूहाचे अंग म्हणून मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाने २००८ मध्ये भारतातील आपला प्रवास सुरू केला. अल्पावधीत या फंड घराण्याने भारतातील अव्वल १० मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये स्थान मिळविताना, २ लाख कोटी रुपयांच्या व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेचा (एयूूएम) टप्पा ओलांडला आहे. मागील पाच वर्षांत त्याच्या एयूएममध्ये ५४ टक्के चक्रवाढ दराने वाढ झाली आहे.