Mukesh Ambani takes zero salary for fifth year in a row : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्येही कसलाही पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे. अंबानी यांनी करोना महामारीच्या काळात पगार आणि इतर लाभ न घेण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला होता, जो त्यांनी पुढे कायम ठेवला आहे. ६७ वर्षीय अंबानी यांनी आर्थिक वर्ष २०२१ पासून कसलाही पगार घेतलेला नाही. आर्थिक वर्ष २००९ आणि २०२० या काळात त्यांनी वार्षीक पगार हा स्वेच्छेने १५ कोटी रुपये ठेवला होता.
अंबानी यांनी त्यांना मिळणारे वेतन जरी पूर्णपणे सोडून दिले असले तरी त्यांना मिळणारा dividends (लाभांश) म्हणजेच कंपनीच्या भागधारकांना कंपनीला झालेल्या नफ्यातील वाटून मिळालेला भाग हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. अंबानी यांच्याकडे वैयक्तीकरित्या रिलायन्सचे १.१६ कोटी शेअर्स आहेत, ज्यामुळे त्यांनी याच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही आकडेवारी कंपनीने जाहीर केलेल्या प्रति शेअर ५.५० रुपयांच्या लाभांशानुसार आहे. यासंबंधीचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
अंबानींच्या मुलांनी किती पैसे कमवाले?
ऑक्टोबर २०२३ मध्ये आरआयएल बोर्डमध्ये मुकेश अंबानी यांची तीन मुले – ईशा अंबानी पिरामल, आकाश आणि अनंत अंबानी हे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स म्हणून सहभागी झाली आहेत. त्यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये प्रत्येकी २.३१ कोटी रुपये कमावले. यामध्ये ६ लाख रुपये सिटिंग फी (sitting fees) आणि २.२५ कोटी रुपये कमिशन म्हणून कमावले असल्याची माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये त्यांना १.०१ कोटी रुपये मिळाले होते, त्यामुळे या वर्षात त्यांची कमाई वाढली आहे.