पीटीआय, नवी दिल्ली
बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘फॉर्च्यून ग्लोबल ५००’ जागतिक आघाडीच्या कंपन्यांच्या श्रेणीतही सर्वश्रेष्ठ भारतीय कंपनी म्हणून स्थान कायम राखले आहे. २०२५ च्या ताज्या आकडेवारीनुसार, अब्जाधीश मुकेश अंबानी यांची ही कंपनी या क्रमवारीत ८८ व्या स्थानावर आहे.
फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीचा भाग होण्याचे रिलायन्सने हे २२ वे वर्ष आहे. २०२१ मध्ये १५५ व्या स्थानावर असलेला रिलायन्स समूह ६७ स्थानांनी झेप घेत गेल्या वर्षी ८६ व्या स्थानावर पोहोचला होता. वर्ष २०२५ मध्ये तो ८८ व्या स्थानी म्हणजे दोन पायऱ्यांनी घसरला आहे. ताज्या यादीनुसार, किराणा दालन शृंखला चालविणारी अमेरिकेची जागतिक कंपनी वॉलमार्ट जगातील अव्वल क्रमांकाची कंपनी ठरली आहे. त्यानंतर ई-कॉमर्समधील महाकाय कंपनी अमेझॉनचा क्रमांक लागतो. आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये तीन चिनी कंपन्या आहेत. यात वीज क्षेत्रातील सरकारी मालकीची स्टेट ग्रिड तिसऱ्या क्रमांकावर, चीन नॅशनल पेट्रोल पाचव्या क्रमांकावर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील दिग्गज सिनोपेक समूह सहाव्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार सौदी आराम्को चौथ्या क्रमांकावर आणि ॲपल ८ व्या क्रमांकावर आहे.
भारतातील ९ कंपन्या
‘फॉर्च्यूनच्या ग्लोबल ५००’च्या ताज्या यादीत भारतातील नऊ कंपन्या आहेत. त्यापैकी पाच सार्वजनिक क्षेत्रातील आणि चार खासगी क्षेत्रातील आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी ९५ व्या क्रमांकावर आहे, जिच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन २०२५ च्या क्रमवारीत ११ स्थानांनी घसरून १२७ व्या स्थानी आहे. स्टेट बँक १५ स्थानांची झेप घेत १६३ व्या क्रमांकावर आहे, तर एचडीएफसी बँकेने ४८ स्थानांची सुधारणा दर्शवत २५८ वा क्रमांक गाठला आहे.
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) एका स्थानाने घसरून १८१ व्या क्रमांकावर आहे. यादीतील इतर भारतीय कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स २८३ व्या क्रमांकावर (२०२४ पासून १२ स्थानांची घसरण), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) २८५ व्या क्रमांकावर (२७ स्थानांची घसरण) आणि आयसीआयसीआय बँक ४६४ व्या क्रमांकावर (अपरिवर्तित) आहेत.
निवड कशी होते?
फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादी ही ३१ मार्च २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी नोंदविल्या गेलेल्या एकूण उत्पन्नानुसार कंपन्यांची निवड करते.