मुंबई: वाढत्या टॅरिफ तणावापासून ते भू-राजकीय संघर्षांपर्यंत, प्रचंड अनिश्चिततेने भारलेला २०२५ च्या पहिल्या सहामाहीचा अत्यंत आव्हानात्मक काळ जगभरच्या गुंतवणूकदारांनी अनुभवला. भारतीय गुंतवणूकदारांनी मात्र जगाच्या तुलनेत हा चढ-उतारांचा काळ चांगल्या प्रकारे हाताळल्याचे ताजी आकडेवारी दाखवून देते. विशेषतः म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांचा अविचल राहिलेला विश्वास खूपच आश्वासक आहे. याचा प्रत्यय म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक महिनागणिक निरंतर वाढत जात, सरलेल्या जुलैमध्ये २८,४६४ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाची प्रातिनिधीक संघटना ‘ॲम्फी’ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता सुरू असताना, ‘एसआयपी’द्वारे मासिक प्रवाह ४ टक्क्यांनी वाढून २८,४६४ कोटी रुपये झाला. आधीच्या जून २०२५ मध्ये मासिक ‘एसआयपी’ प्रवाह २७,२६९ कोटी रुपये होता.

‘ॲम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, नियमित योगदान देणाऱ्या ‘एसआयपी’ खात्यांची संख्या जूनमधील ८.६४ कोटींवरून, जुलैमध्ये ९.११ कोटी रुपये झाली. म्हणजेच महिनाभरात तब्बल ४७ लाख नवीन खात्यांची भर पडली. जुलैअखेर ९.११ कोटी एसआयपी खात्यांतर्गत, एकूण मालमत्ता (एयूएम) १५.१९ लाख कोटी रुपये झाली आहे. जी जूनमधील १५.३१ लाख कोटी रुपयांवरून किंचित कमी झाली आहे. याचा अर्थ एसआयपी बंद करून बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्याही मोठी आहे.

जुलैअखेर म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण मालमत्ता प्रथमच ७५ लाख कोटी रुपयांपल्याड, ७५.३६ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. यात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूकदारांकडून आलेल्या ओघाचे प्रमाण हे २०.२ टक्के आहे. मासिक तुलनेत नवीन गुंतवणुकीत जुलैमध्ये तब्बल ५ पटीने म्हणजेच १.७८ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. गुंतवणुकीतील सर्वाधिक जवळपास ८० टक्क्यांची वाढ ही समभागसंलग्न योजनांमध्ये अर्थात इक्विटी फंडात दिसून आली. जूनमधील २३,५८७ कोटी रुपयांच्या तुलनेत जुलैमध्ये इक्विटी फंडांनी ४२,७०२ कोटी रुपये आकर्षित केले.

म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण गंगाजळी (एयूएम) ७५ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाणे, हे या उद्योगाने निर्धारीत केलेलया १०० लाख कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या दिशेने योग्य मार्गक्रमण दर्शविणारे आहे. ताजे विक्रमी आकडे हे वाढत्या अनिश्चिततेच्या काळात, भारताच्या बाजारपेठेचे, गुंतवणूकदारांच्या दृढतेचे आणि परिपक्वतेचे चोख लक्षण निश्चितच आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए बालसुब्रमण्यम यांनी दिली. विक्रमी गुंतवणूक आकर्षित करण्यात नव्याने दाखल योजनांचे मोठे योगदान राहिले. जुलै महिन्यांत ४५ नवीन योजना म्युच्युअल फंड घराण्यांकडून गुंतवणुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. ज्यामाध्ये सर्वाधिक १० इक्विटी योजना, ५ डेट योजना आणि १३ इंडेक्स तसेच ईटीएफ योजनांचा समावेश होता. या नवीन योजनांद्वारे ३०,४१६ कोटी रुपये गुंतवणुकीची एकूण गंगाजळीत भर पडली आहे.