केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात महामार्ग, प्रमुख आणि जिल्हा मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मंत्र्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) योजनेअंतर्गत ८ पुलांसाठी अंदाजे १८२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चला, संपूर्ण बातमीबद्दल जाणून घेऊया.

पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते, ग्रामीण रस्ते, रेल्वेखालील आणि ओव्हर ब्रिजचा विकास आणि देखभाल करण्यासाठी केंद्रीय रस्ते निधी योजना वर्ष २०००-०१ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम आणि नूतनीकरणासाठी सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (CRIF) अंतर्गत संसाधनांचे वाटप केले जात होते. एक्स पोस्टमध्ये गडकरी म्हणाले की, २०२३ -२४ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्तेमार्ग आणि पायाभूत सुविधा निधी(CRIF) या अंतर्गत ८ पुलांसाठी एकूण १८१.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! पेट्रोल अन् डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार, मोदी सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आणि भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे. मंजूर केलेल्या उपक्रमांद्वारे तेथील दुर्गम गावांशी संपर्क सुधारणार आहे. यामुळे लडाखमधील आर्थिक हालचाली विशेष करून कृषी आणि पर्यटनाला चालना मिळून सर्वांगीण पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे, असे आपल्या एक्स पोस्टमध्ये गडकरी म्हणाले आहेत.

हेही वाचाः देशातील ‘या’ ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित, तुमचे खाते आहे ना?

लडाखला ग्रीन एनर्जी कॉरिडॉर मिळणार

ऑक्टोबरच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने लडाखमध्ये स्थित १३ GW अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या सुविधेसाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर (GES) फेज-II आणि आंतर-राज्य पारेषण प्रणाली (ISTS) च्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली होती. २०,७७३.७० कोटी रुपयांच्या एकूण अंदाजित खर्चासह आर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग ३०१ चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या २३० किमी लांबीच्या कारगिल-झांस्कर रस्त्याचे अपग्रेड आणि रुंदीकरण सुरू केले आहे.