Trump Tariff on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के शुल्क लादले आहे. यानंतर वाढलेला अमेरिकेबरोबरच्या व्यापाराचा खर्चाच्या (Trade Costs) बदल्यात रशियाकडून स्वस्त तेल आयात करणे इतके महत्त्वाचे आहे का? याचा पुन्हा एकदा विचार भारताने करावा असे आवाहन नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी भारताला केले आहे.

गेल्या आठवड्यात भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादला. यामुळे भारतीय वस्तुंवरील शुल्क हे ५० टक्क्यांवर गेले आहे. हे शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा मोठा फटका भारतीय उद्योगांना होणार आहे.

बॅनर्जी नेमकं काय म्हणाले?

यादरम्यान पीटीआयशी बोलताना बॅनर्जी म्हणाले की, “भारताने स्वस्त तेल आणि अमेरिकन बाजारातील संभाव्य तोटा याबद्दल गंभीरपणे विचार केला पाहिजे. “रशियन तेल आयात करणे इतके महत्त्वाचे आहे का याचा आपण गांभिर्याने विचार केला पाहिजे आणि नंतर अमेरिकेत परत जावून सांगावे की… जर आम्ही रशियाकडून तेल आयात करणे थांबवले तर त्यांच्याकडून ते (टॅरिफ) कमी केले जाईल का.” असे बॅनर्जी बीएमएल मुंजाल विद्यापीठातील एका कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले.

भारत हा सध्या रशियाच्या कच्च्या तेलाचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारताने जुलै महिन्यात दररोज १.६ दशलक्ष बॅरल तेलाची आयात केली आहे. मात्र रिफायनर्सनी ऑगस्ट किंवा सप्टेंबरकरिता कोणत्याही नवीन ऑर्डर दिलेल्या नाहीत, करण तेलाच्या किंमतील सवलत ही प्रति बॅरल सुमारे २ डॉलरपर्यंत कमी झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात भारताने रशियाच्या २४५ दशलक्ष टन कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी एक तृतीयांश म्हणजेच ८८ दशलक्ष टन रशियन तेल आयात केले होते.

भारताची तेल आयात

  • सर्वांत आधी आपण रशियाकडून भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीबद्दल बोलायचे झाल्यास, देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला दररोज ५० लाख बॅरल्सपेक्षा जास्त तेल लागते, त्यापैकी ८५ टक्के तेल आयात केले जाते.
  • भारत आज रशियाकडून एक-तृतीयांश कच्चे तेल आयात करतो. भारताने या वर्षी एकट्या रशियाकडून ८८ दशलक्ष मेट्रिक टन तेल खरेदी केले आहे.
  • जुलैमध्ये भारताला रशियाकडून दररोज २० लाख बॅरल्सपेक्षा जास्त तेल मिळाले. जानेवारी ते जून या काळात भारताने रशियाकडून दररोज सुमारे १७.५ लाख बॅरल्स तेल खरेदी केले.
  • २०२४ मध्ये हा आकडा आणखी जास्त होता. २०२४ मध्ये भारत दररोज १९ लाख बॅरल्स तेल आयात करायचा.
  • २०२० मध्ये रशियाने भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी फक्त १.७ टक्का पुरवठा केला होता.
  • २०२१ मध्ये भारत रशियाकडून फक्त एक लाख बॅरल्स तेल आयात करत होता.