मुंबई: देशातील आघाडीचा बाजार मंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईची बहुप्रतिक्षित प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) गुंतवणूकदारांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे बाजारमंचांच्या प्रमुखांनी गुरुवारी सूचित केले.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून अजूनही ना हरकत प्रमाणपत्र एनएसईला प्राप्त झालेले नाही. सेबीकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ‘एनएसई’कडून मसुदा प्रस्ताव तयार करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सेबीच्या मसुदा प्रस्ताव चाचपणी विभागाकडून त्याला मान्यता मिळण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो. म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्षात ‘आयपीओ’साठी गुंतवणूकदारांना अजून आठ ते नऊ महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आशीष कुमार चौहान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

एनएसईचे मूल्यांकन सुमारे ४.७ लाख कोटी रुपये आहे. २०२४ च्या बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० च्या सूचिबद्ध आणि सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांच्या यादीनुसार, देशातील ही १० व्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान खासगी कंपनी आहे. स्पर्धक मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईचा समभाग २०१७ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला. भांडवली बाजारात समभाग सूचिबद्ध करणारे ते भारतातील पहिला बाजारमंच बनले. तथापि एनएसईची ‘आयपीओ’ची योजना गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ रखडली आहे. अलिकडेच एनएसईने सेबीकडे पुन्हा एकदा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करून त्यांच्या समभागांची भांडवली बाजारात सूचिबद्धतेची प्रक्रिया पुन्हा पटलावर आणली आहे.

भारतीय भांडवली बाजारात पार पडणाऱ्या वायदे व्यवहारांची संख्या जगात सर्वात मोठी आहे. मात्र अमेरिकेत केवळ कंपन्यांच्या समभागांमध्ये ऑप्शन्स व्यवहार पार पडतात आणि तो भारतीय ऑप्शन्स बाजाराच्या तुलनेत आठपट मोठा आहे. तर अमेरिकेचा फ्युचर बाजार हा भारताच्या २० पट मोठा आहे. पण याचा अर्थ भारतीय वायदे बाजार मागे नाही. जेन स्ट्रीटच्या बेकायदेशीर व्यवहारांच्या घटनेमुळे नक्कीच या व्यवहारांवर तात्पुरता परिणाम झाल्याचे दिसत आहे. मात्र भांडवली बाजार नियामक आवश्यक ती पावले उचलत आहे आणि संभ्रम दूर केला जात आहे, असे चौहान यांनी सांगितले.

शेअर बाजाराचा मुख्य उद्देश बचतीला योग्य ठिकाणी वळवण्याचे आहे म्हणजेच गुंतवणूकदारांकडून कंपन्यांकडे पैसा वळवून त्यातून भांडवल उभारणी आणि रोजगार निर्मितीद्वारे अर्थव्यवस्थेला बळकट केले जात आहे. ट्रेडिंग हे केवळ समभागांचा भाव निश्चित करण्याचे माध्यम आहे. गुंतवणूकदार म्हणूनच बाजारात छोट्या गुंतवणूकदारांनी वावरायला हवे. बऱ्याचदा गुंतवणुकीची व्याख्याच विसरली जाऊन, टिप्स अथवा इतर माध्यमांवरून इंट्राडे व्यवहार केले जातात. वायदे बाजाराविषयी माहिती नसेल तर आपण त्यात व्यवहार करणे टाळायला हवे. त्या उलट सूज्ञतेने निर्णय घेऊन दीर्घकालीन गुंतवणूक केली जाणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड देखील गुंतवणुकीचे चांगले माध्यम आहे. आर्थिक सल्लागाराच्या मदतीने शेअर बाजारात दीर्घकालावधीसाठी व समजुतीने गुंतवणूक केल्यास निश्चितच चांगला परतावा मिळेल, असे चौहान म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थितप्रज्ञ’चे अनावरण

‘स्थितप्रज्ञ’ या डॉ. मयूर शाह लिखित पुस्तकात आशीष कुमार चौहान यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचे वर्णन आहे. ‘स्थितप्रज्ञ’ अर्थात संतुलन राखण्याची प्रक्रिया ही चौहान यांच्या जीवनक्रमाचा भाग बनली आहे. अगदी सामान्य महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळापासून ते भारतातील सर्वात मोठ्या बाजारमंचाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचा पुस्तकात समावेश आहे. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही तर ते भारताच्या बदलत्या परिस्थितीची कहाणी देखील सांगते, असे शाह यांनी याप्रसंगी सांगितले.