मुंबईः पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाच्या मालमत्तेने १ लाख कोटींचा टप्पा पार केल्याचे पीपीएफएएस म्युच्युअल फंडाचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी नील पारिख यांनी गुरुवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील टिप्पणीतून स्पष्ट केले.

भारतातील सक्रियपणे व्यवस्थापित कोणत्याही म्युच्युअल फंडाने पहिल्यांदाच एकूण मालमत्तेत (एयूएम) १ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला असल्याचे त्यांनी नमूद केले. नील पारिख म्हणाले, “मी सामान्यतः एयूएमबद्दल बोलत नाही किंवा आमच्या फंडांच्या एयूएमचा टप्पा गाठण्याचे लक्ष्यही निर्धारीत होत नसले तरी आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. पीपीएफएएस फ्लेक्सी कॅपने आज १ लाख कोटी रुपये एयूएमचा टप्पा ओलांडला… मला वाटते, भारतात अशी कामगिरी करणारी सक्रियपणे व्यवस्थापित ही पहिलीच योजना आहे.”

पीपीएफएएसच्या संपूर्ण चमूचे, वितरण भागीदारांचे आणि गेल्या काही वर्षांत फंडावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांबद्दलही त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड ही लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि परदेशात नोंदणी झालेल्या कंपन्यांत गुंतवणूक असणारी एक मुदतमुक्त योजना आहे. राजीव ठक्कर, रौनक ओंकार, राज मेहता, रुकुन ताराचंदानी आणि मानसी कारिया यांच्याद्वारे या योजनेचे निधी व्यवस्थापन पाहिले जाते. उपलब्ध आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ रोजी या फंडाची मालमत्ता (एयूएम) ९३,४४०.८९ कोटी रुपये होती. या फंडाच्या ‘रेग्युलर प्लान’ने सुरुवातीपासूनच १९.०४ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे, तर ‘डिरेक्ट प्लान’ने १९.८९ टक्के दराने वार्षिक सरासरी परतावा दिला आहे. फंडाच्या स्थापनेपासून ‘रेग्युलर प्लान’मध्ये दरमहा १०,००० रुपयांप्रमाणे ‘एसआयपी’ केलेल्या १४.४० लाख रुपये गुंतवणुकीचे, मार्च २०२५ अखेर ४८.९६ लाख रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर १९.०६ टक्के आहे.