मुंबई : भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात ‘एसएमई’ कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र विद्यमान कॅलेंडर वर्षात ‘एसएमई’ मंचावर पदार्पण करणाऱ्या कंपन्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
विद्यमान वर्षात आतापर्यंत ‘एसएमई’ मंचावर पदार्पण केलेल्या ९४ ‘एसएमई आयपीओं’पैकी केवळ नऊ कंपन्यांच्या आयपीओंनी पदार्पणात १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर ७ जुलैपर्यंत सहा कंपन्यांनी ५०-१०० टक्क्यांदरम्यान, १६ कंपन्यांनी २०-५० टक्के आणि १४ कंपन्यांनी १-२० टक्के इतका माफक परतावा दिला. सरलेल्या वर्षातील आयपीओ बाजारातील अनिर्बंध तेजीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र पदार्पणातील परतावा टिकवून ठेवण्यात कंपन्या अपयशी ठरल्या आहेत.
पदार्पणापासून सुमारे १५ कंपन्यांचे आयपीओ ३०-५० टक्क्यांच्या दरम्यान घसरले आहेत, तर ८ कंपन्यांच्या समभागांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ७ कंपन्यांनी पदार्पणात २० ते ३० टक्के, ८ कंपन्यांनी १० ते २० टक्क्यांची घसरण अनुभवली. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असूनही, बहुतेक एसएमई कंपन्यांना त्यांच्या सूचिबद्धतेनंतर नफा टिकवून राखण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
कामगिरी कशी?
सूचिबद्धतेनंतर सर्वात जास्त नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये, फॅबटेक टेक्नॉलॉजीजचा समावेश होता, तिने ३६० टक्के वाढ नोंदवली आहे, त्यापाठोपाठ श्रीगी डीएलएम आणि इंडोबेल इन्सुलेशनचा क्रमांक लागतो, ज्यांनी अनुक्रमे १६४ टक्के आणि १६१ टक्के परतावा दाखवला आहे. इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये सोलारिम ग्रीन एनर्जी, टँकअप इंजिनीअर्स आणि सॅट कर्तार शॉपिंग यांचा समावेश आहे, ज्यांनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला. दुसरीकडे, सुपर आयर्न फाउंड्रीने ६८ टक्के घसरणीसह सर्वात सुमार कामगिरी केली. स्वस्त फूडटेक इंडिया आणि सिटीकेम इंडिया यांचे समभाग ६० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर इन्फोनेटिव्ह सोल्युशन्स, डेव्हिन सन्स रिटेल, केन एंटरप्रायझेस आणि अरुणय ऑरगॅनिक्स यांचे समभाग सूचिबद्धतेपासून आतापर्यंत ५२ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
घसरणीची कारणे काय?
‘एसएमई’ मंचावरील मर्यादित तरलता, आक्रमक नफावसुली आणि कंपनीच्या कामगिरीच्या तुलनेत वाढलेले मूल्यांकन हे मुख्यतः घसरणीस कारणीभूत आहे. दीर्घकालावधीत व्यवसायाच्या संधींबद्दल पुरेशी खात्री नसतानाही अनेक गुंतवणूकदार नफा मिळविण्यासाठी ‘एसएमई आयपीओं’साठी अर्ज करतात, ज्यामुळे पदार्पणानंतर या श्रेणीमध्ये तीव्र चढ-उतार होण्याची शक्यता असते, असे मत ट्रेडजिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेश डी यांनी सांगितले.