Petrol Diesel Price In Pakistan: भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे, त्यानंतर तिथल्या लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तानच्या दुरवस्थेची सतत चर्चा होत असताना पाकिस्ताननं जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे कोट्यवधी लोकांचं बजेट अक्षरशः कोलमडलं आहे. परंतु अन्वर-उल-हक काकर यांच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोलच्या दरात कपात करून जनतेला दिलासा देण्याचं काम केले आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कपात झाल्याची बातमी ट्विटरवर ट्रेंड करीत आहे आणि भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी कमी होतील हे माहीत नसल्याबद्दल लोक मोदी सरकारवर टीका करीत आहेत.
हेही वाचाः IT पदवी घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; टाटांची टीसीएस ४० हजार जणांची भरती करणार
पाकिस्तानात आता किमती काय आहेत?
याआधी पाकिस्तान सरकार पेट्रोलचे दर ३५ रुपयांनी कमी करू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता, पण इथे जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि पेट्रोलची किंमत ४० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर हायस्पीड डिझेलच्या दरात १५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नव्या किमती आजपासून म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. आता पाकिस्तानातील लोक पेट्रोल २८३.३८ रुपये प्रति लिटर आणि हायस्पीड डिझेल ३०३.१८ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करू शकतील. ३० सप्टेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८ आणि ११ रुपयांची कपात करण्यात आली होती.
हेही वाचाः केरळमध्ये अदाणींचे नवे बंदर, २० हजार कोटींची गुंतवणूक करणार अन् बरंच काही, जाणून घ्या
भारतात महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे लोक हैराण
भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या किमतींमुळे लोक हैराण झाले आहेत आणि त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. देशभरात पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. पुढील वर्षी भारतात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीच्या प्रयत्नानं पाकिस्तानच्या विस्कळीत झालेल्या जनजीवनावर फुंकर मारण्याचे काम केले आहे, पण त्याचा भविष्यात काय परिणाम होईल हे कालांतरानेच समजणार आहे.