वर्ष १९५८ मध्ये स्थापन झालेली हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड ही आदित्य बिर्ला ग्रुपची एक प्रमुख कंपनी आहे. कंपनी आणि तिच्या उपकंपन्या, नोव्हेलिससह प्रामुख्याने ॲल्युमिनियम आणि तांब्याचे अग्रेसर उत्पादक आहेत. याखेरीज कंपनी पॅकेजिंग बाजारपेठेत वापरण्यासाठी ॲल्युमिनियम शीट, एक्सट्रुजन आणि लाइट गेज उत्पादनांच्या निर्मितीमध्येदेखील कार्यरत आहे.

व्यवसाय विभाग

१) उपकंपनी, नोव्हेलिस ही फ्लॅट-रोल्ड ॲल्युमिनियम उत्पादनांची आघाडीची उत्पादक आणि ॲल्युमिनियमची जगातील सर्वात मोठी पुनर्वापर करणारी कंपनी आहे. ती पेय पदार्थांचे कॅन, ऑटोमोबाइल्स, एरोस्पेस आणि फॉइल पॅकेजिंग, वाहतूक उत्पादने इत्यादीसारख्या विशेष बाजारपेठांसह विविध उद्योगांना उत्पादने आणि सेवा पुरवते.

२) तांबे : कंपनी ऑटोमोटिव्ह, ग्राहकोपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे इत्यादी उद्योगांसाठी विविध आकारांत तांबे कॅथोड आणि कास्ट कॉपर रॉड तयार करते. कंपनी कॉपर कॅथोड रॉड्सच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असून, ती गुजरातमधील दहेज येथे कॅप्टिव्ह जेट्टी असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या कस्टम कॉपर स्मेल्टरपैकी एक आहे.

३) ॲल्युमिनियम: हिंदाल्को उत्पन्नाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ॲल्युमिनियम कंपनी आहे असून शिपमेंटच्या आधारे जागतिक स्तरावरील आघाडीच्या पाच ॲल्युमिनियम उत्पादकांमध्ये हिंदाल्कोचा समावेश होतो. ती बॉक्साइट खाणकाम, ॲल्युमिना रिफायनिंग, कोळसा खाणकाम, कॅप्टिव्ह पॉवर प्लँट्स आणि ॲल्युमिनियम स्मेल्टिंगपासून डाउनस्ट्रीम रोलिंग, एक्सट्रुजन आणि फॉइलपर्यंत मूल्य साखळीत काम करते.

४) रसायने : कंपनी ग्राइंडिंग मीडिया, वेअर-रेझिस्टंट सिरेमिक घटक इत्यादींमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅल्क्लाइंड ॲल्युमिना आणि ॲल्युमिनियम सल्फेट, जिओलाइट इत्यादी जलशुद्धीकरण रसायने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिना हायड्रेट्सचे उत्पादनदेखील करते.

उत्पादनक्षमता

कंपनीचे भारतात २० प्रकल्प असून, २३ बॉक्साइट आणि कोळसा खाणी आहेत तसेच नोव्हेलिसअंतर्गत ३२ परदेशातील प्रकल्प आहेत त्यापैकी १४ मध्ये रिसायकलिंग सुविधांचा समावेश आहे.

क्षमता विस्तार

नोव्हेलिस: आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीने दक्षिण कोरियातील उल्सान येथे १०० केटी रिसायकलिंग सुविधा कार्यान्वित केली. त्यांनी अमेरिकेतील बे मिनेट येथे ६०० केटी ग्रीनफील्ड रोलिंग आणि रिसायकलिंग प्रकल्पामध्ये ४.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे . हा प्रकल्प यंदाच्या आर्थिक वर्षांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. कंपनी ब्रिटनमधील लॅचफोर्ड येथे ९० दशलक्ष डॉलरमध्ये रिसायकलिंग आणि कास्टिंगचा विस्तार करत आहे आणि ओस्वेगो, लोगान आणि पिंडा येथे अडथळे दूर करण्यासाठी ३३० दशलक्ष डॉलर वाटप करत आहे.

ॲल्युमिना आणि तांबे :

कंपनी ओडिशामध्ये ७,५००-८,००० कोटी रुपयांचा ८५० केटी आदित्य ॲल्युमिना रिफायनरी विकसित करत आहे, ज्यामुळे तिची डाउनस्ट्रीम क्षमता ६०० केटीपीएपर्यंत वाढेल. ती गुजरातमध्ये २,७०० कोटी रुपयांचा ५० केटी तांबे पुनर्वापर प्रकल्पदेखील उभारत आहे. दोन्ही गुंतवणूक आर्थिक वर्ष २६-२७ मध्ये केली जाईल.

कोळसा खाण वाटप

डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने ओडिशामधील मीनाक्षी कोळसा खाण सुरक्षित केली, जी १२ एमटीपीएची पीक रेटेड क्षमता (पीआरसी) आणि २८५.२३ एमटी भूगर्भीय साठा असलेली पूर्णपणे एक्सप्लोर केलेली ब्लॉक आहे. कंपनीने गेल्याच आठवड्यात बांधा कोल ब्लॉकमधील एमिल माइन अँड मिनेरल्समधील १०० टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. त्याचा महान पॉवर प्रकल्पाला फायदा होईल.

अक्षय्य ऊर्जा लक्ष्य

कंपनीची एकूण अक्षय्य क्षमता १८९ मेगावाॅट आहे. आर्थिक वर्ष २६ मध्ये ३०० मेगावाॅटची अक्षय्य ऊर्जा क्षमता साध्य करण्याचा त्यांचा मानस आहे, ज्यामध्ये हायब्रिड स्टोरेजसह १०० मेगावाॅट सौर ऊर्जा क्षमता समाविष्ट आहे.

कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी सरलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत १० टक्के वाढ साध्य करून ती २,३८,४९६ कोटींवर नेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ५८ टक्के वाढ होऊन तो १६,००२ कोटींवर गेला आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने ६४,८९० कोटी उलाढाल (१६ टक्के वाढ) करून ५,२८४ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ६६ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये दोन पुनर्वापर केंद्रे (उल्सान, दक्षिण कोरिया १०० कि.टन आणि गुथ्री, अमेरिका २४० कि.टन) कार्यान्वित केली असून यंदाच्या आर्थिक वर्षांत त्यामध्ये पूर्ण वाढीने सुमारे ३०० दशलक्ष डॉलर स्ट्रक्चरल खर्च सुधारणा आणि कार्यक्षमता योजना सुरू होईल. कंपनीचा अमेरिकेतील ६०० कि.टन ग्रीनफील्ड रोलिंग आणि रिसायकलिंग प्रकल्प (बे मिनिट) कार्यान्वित होत आहे, ९० टक्क्यांहून अधिक अभियांत्रिकी पूर्ण झाली आहे आणि २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

सध्या केवळ ६५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई कोड ५००४४०)

संकेतस्थळ : www.hindalco.com

प्रवर्तक: आदित्य बिर्ला समूह

बाजारभाव: रु.६५१/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ॲल्युमिनियम

भरणा झालेले भाग भांडवल: रु. २२२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ३४.६५

परदेशी गुंतवणूकदार २८.१५

बँक/ म्युच्युअल/ सरकार २५.०३

इतर/ जनता १२.१७

पुस्तकी मूल्य: रु. ५५०

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: ३५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ७१.२०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८.७९

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २०.५

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.५२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७.७९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (आरओसीई): १५.२%

बीटा:

बाजार भांडवल: रु. १,४६,२७२ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७७३/५४६

गुंतवणूक कालावधी : २४ महिने  

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.