आर्थिकदृष्ट्या सुरक्षित निवृत्तीसाठी नियोजन करणे हे आपल्यापैकी बहुतेकांसाठी सर्वात महत्त्वाचे परंतु अनेकदा सर्वात कमी प्राधान्य दिले जाणारे वित्तीय ध्येय असते. वाढते आयुर्मान, बदलती जीवनशैली, वाढती अनिश्चितता आणि महागाई यामुळे, आज निवृत्ती नियोजन प्रत्येकाची प्राथमिकता असायला हवी. निवृत्ती नियोजनासाठी धोरणात्मक दूरदृष्टी आणि कठोर शिस्तबद्ध अंमलबजावणी दोन्ही आवश्यक आहेत. मला आशा आहे की, आजचा विषय वाचकांना या बाबतीत नेमके मार्गदर्शन करेल आणि यामुळे कठीण वाटणाऱ्या किंवा टाळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या उद्दिष्टाकडे आपण आत्मविश्वासाने वाटचाल करू लागाल.
१. मला निवृत्तीसाठी किती रकमेची आवश्यकता आहे?
एक साधा नियम: निवृत्तीच्या वेळी तुमच्या वार्षिक खर्चाच्या २५-३० पट निधीचे लक्ष्य ठेवा. ४ टक्के वार्षिक दराने वार्षिकी (ॲन्यूइटी) घेतल्यास आणि शिल्लक रक्कमेवर उच्च एक आकडी (८ ते ९ टक्के) दराने परतावा मिळाला तरी शिल्लक रक्कम ३० पेक्षा अधिक वर्षे उदरनिर्वाहासाठी टिकू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताचा खर्च नव्हे, निवृत्तीच्या वेळचा खर्च! मी हे एका उदाहरणाने स्पष्ट करतो. समजा तुमचे वय ३८ वर्षे आहे आणि तुम्हाला ५८ व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे. गृहीत धरा तुमचा सध्याचा वार्षिक खर्च १२ लाख रुपये आहे. महागाईमुळे, पुढील २० वर्षांत तुमचा वार्षिक खर्च सध्याच्या १२ लाख रुपयांवरून ३८ लाख रुपयांपर्यंत वाढलेला असेल. म्हणून जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ५८ व्या वर्षी निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्याकडे ३८ लाख X ३० = ११.४० कोटी रुपये असणे आवश्यक असेल.
या उदाहरणाने निवृत्ती नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा नियमही अनायासे अधोरेखित केला आहे. जितक्या लवकर तयारी सुरू, तितक्या सहजतेने भरारी मारू!
२. वयोगटानुसार योग्य नियोजन
२.१ वय २५–३५ : गुंतवणुकीची सुरुवात करायची सर्वोत्तम वेळ
तुमच्याकडे चक्रवाढीच्या जादूसाठी पुरेसा वेळ आहे. निवृत्त होण्यास २५-३० वर्षे शिल्लक असतील तर आवश्यक रक्कम केवळ वेळ आणि चक्रवाढ दराच्या बळावर उभी राहू शकते.
समभाग संलग्न म्युच्युअल फंडांमध्ये लगेचच ‘एसआयपी’ सुरू करा. ३० वर्षांसाठी २०,००० रुपये महिना ‘एसआयपी’ दरवर्षी फक्त १२ टक्के दराने ४.६३ कोटी रुपयांचा निधी निर्माण करू शकते. तुमचे उत्पन्न जसे वाढेल, तशी दरवर्षी तुमची ‘एसआयपी’ किमान १० टक्के दराने वाढवा. बचतीला स्थैर्य आणि कर कार्यक्षमता जोडण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि नव्या निवृत्ती योजनेला (एनपीएस) बचतीचा एक भाग बनवा. ही गुंतवणूक साधने एकत्रित १० ते १२ टक्के परतावा देऊ शकतात आणि तुम्ही ८ ते १० कोटी रुपये निवृत्ती निधी जमा करू शकाल. जोखीम स्वीकारण्यासाठी तरुण वय ही सर्वोत्तम वेळ आहे. तेव्हा आक्रमक पण वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओपासून सुरुवात करा.
२.२ वय ३६–४९ : बचतीचा वेग वाढवा, जोखीमस्थैर्य यांचा समतोल राखाजर तुम्ही चाळिशीत असाल आणि सेवानिवृत्तीस १० ते २० वर्षे शिल्लक असतील तर आता गुंतवणूक आणि सुरक्षितता दोन्ही वाढवा. हा तुमच्या कारकीर्दीतील सर्वोच्च उत्पन्न प्राप्तीचा टप्पा आहे. आक्रमकपणे बचत करा. समभाग संलग्न ‘एसआयपी’, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि नव्या निवृत्ती योजनेद्वारे १ ते १.५ लाख/महिना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तीन-चार वर्षांतून एकदा तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा संतुलित करा.
मालमत्ता विभाजनासाठी हे सूत्र वापरा
६०-७० टक्के इक्विटी म्युच्युअल फंड (वाढीसाठी)
२०-३० टक्के रोखे गुंतवणूक (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि नवी निवृत्ती योजना )
रोकडसुलभ आपत्कालीन निधी १० टक्के
२० वर्षांसाठी १ लाख/महिना एसआयपी ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभी करू शकते. त्यातून मासिक खर्चासाठी ४ टक्के पैसे काढले तरी २५-३० लाख/वर्ष इतका निधी चांगल्या निवृत्ती जीवनशैलीसाठी पुरेसा आहे. महत्त्वाचे म्हणजे, या वयात अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरुवात करा. वयाच्या ५५ व्या वर्षी कर्जमुक्त होण्यास प्राधान्य द्या.
२.३ वय ५०–६० : शेवटची संधी – भांडवल टिकवणे महत्त्वाचे
आता जोखीम कमी करत स्थिरता वाढवा. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असाल, तरी ती सुरक्षित पर्यायांकडे वळवा. तुम्ही तुमच्या जीवनाच्या अशा टप्प्यावर आहात, जिथे मुद्दलाचे संरक्षण करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. कमी अस्थिर गुंतवणूक साधनांचा वापर करा.
संतुलित फायद्यासाठी लार्ज कॅप, हायब्रिड यांसारख्या इक्विटी फंडात ४०-५० टक्के, कर्जरोखे किंवा मुदत ठेवींमध्ये (एफडी) ४० टक्के आणि रोकडसुलभतेसाठी १०-२० टक्के असा पोर्टफोलिओ ठेवा. जर तुम्ही १० टक्के दराने ८ वर्षांसाठी १.५ लाख रुपये प्रतिमहिना गुंतवले, तर तुम्ही अजूनही २ कोटी उभारू शकता. त्याला ग्रॅच्युइटी, ‘पीएफ’ आणि विद्यमान बचत जोडल्यास (तुम्ही पूर्वी फार चांगले नियोजन केले नसले तरीही) ४-५ कोटींचा निवृत्ती निधी उभा करणे शक्य आहे. एक वेगळा आरोग्यसेवा निधी बाजूला ठेवा आणि चांगला ज्येष्ठ नागरिक विमा काढा.
३. निवृत्तीनंतरच्या निधीचे व्यवस्थापन
निवृत्त झाल्यानंतर, संचयाच्या टप्प्यातून तुम्ही खर्चाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. निवृत्तीनंतर पैसा वाढवायचा नसतो, टिकवायचा असतो.
तुमच्या निवृत्ती मालमत्तेचे विभाजन करा:सुरक्षित उत्पन्न साधनांमध्ये ४०-५० टक्के: ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पंतप्रधान वय वंदन, रिझर्व्ह बँकेचे रोखे, वार्षिकी, अल्प मुदतीचे रोखे
हायब्रिड इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये ३०-४० टक्के
लिक्विड फंडांमध्ये १०-२० टक्के (आणीबाणीसाठी किंवा पुढील २ वर्षांच्या खर्चासाठी)
निवृत्त जीवनासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा
म्युच्युअल फंडांमधून सिस्टेमॅटिक विड्रॉवल प्लॅन अर्थात ‘एसडब्ल्यूपी’ कर कार्यक्षमता आणि वृद्धी देऊ शकतात.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (एनपीएस) आणि विमा कंपन्यांकडून मिळणारे वार्षिकी हमी उत्पन्न देतात — (विशेषतः मनःशांतीसाठी)
तुमच्या बचतीची क्रयशक्ती टिकविण्यासाठी महागाईसाठी समायोजित केलेल्या ३-४ टक्के ‘विड्रॉवल’ नियमाचे पालन करा.
४. परत एकदा महत्त्वाचे मुद्दे
• लवकर सुरुवात करा – चक्रवाढीची शक्ती तुमचा सर्वात मोठा सहयोगी आहे.
गुंतवणुकीत वैविध्य ठेवा, बचत दर वर्षागणिक वाढवाआरोग्य, अपघात, अचानक बदल यांची तयारी असू द्या
निवृत्तीनंतर जोखमीपासून लांब राहा
तुमच्या पोर्टफोलिओचा नियमितपणे मागोवा घ्या, पुनरावलोकन करा आणि पुनर्संतुलन करा.
५ निष्कर्ष : निवृत्ती ही एक असे बक्षीस आहे, जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळवलेच पाहिजे!तुमचे भविष्य तुमच्याकडून निवृत्तीचे स्वातंत्र्य मागत आहे आणि त्यासाठी योग्य नियोजन करणे तुमचे सगळ्यात मोठे कर्तव्य आहे.
निवृत्ती खूप दूर वाटू शकते – पण ती अचानक जवळ येते. म्हणून लवकर सुरुवात करा. सातत्याने बचत करा, हुशारीने समायोजित करा आणि एक निश्चिंत उद्या घडवा.