मुंबई : विकसित भारताचे स्वप्न आपण साकार करावयाचे तर, संशोधन, विकास आणि नवोपक्रम हे आपल्या विकास प्रवासाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. संशोधन केवळ विद्यापीठे आणि प्रयोगशाळांमध्येच नव्हे तर उद्योगांचा त्यात हिरीरीने सहभाग हवा, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी केले.मुख्यतः खासगी क्षेत्रातून संशोधन आणि विकास उपक्रम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानात खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचाही करंदीकर यांनी याप्रंसगी माहिती दिली.

१ लाख कोटी रुपयांचा संशोधन, विकास आणि नवोपक्रम निधी, राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन फॉर रिसर्च आणि राष्ट्रीय क्वांटम मिशन, आणि एआय मिशन सारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.याच अनुषंगाने मुंबईत ‘फिक्की’च्या सहयोगाने आयोजित कार्यशाळेत करंदीकर बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वेक्षण २०२४-२५ वर आयोजित या कार्यशाळेत, उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

उद्योग आणि शैक्षणिक भागीदारी मजबूत करणे आणि भारतातील मजबूत, विदा-चालित नवोन्मेष परिसंस्थेसाठी ठोस धोरण तयार करणे असा या सर्वेक्षणाचा उद्देश असल्याचे करंदीकर यांनी नमूद केले.खाजगी क्षेत्रातून फलप्राप्तीला दीर्घ कालावधी लागणाऱ्या संशोधनांत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासासाठी गुंतवणूक करण्यास टाळाटाळ केली जाते, असे चित्र असल्याचे प्रा. करंदीकर यांनी खेदपूर्वक नमूद केले. ही मानसिकता लवकरात लवकर बदलली जाणे आवश्यक असल्याचे नमूद केले.