RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत २ हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची माहिती दिली. बँकांमध्ये नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची मुदत काही तासांत संपणार असतानाच ही माहिती समोर आली आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून बँकांमध्ये जमा करण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर आहे. त्यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. नंतर ती वाढवून ७ ऑक्टोबर करण्यात आली. आरबीआयने १९ मे रोजी २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याची घोषणा केली होती आणि २३ मेपासून प्रक्रिया सुरू झाली होती. २ हजार रुपयांच्या नोटेबाबत आरबीआय गव्हर्नरने काय म्हटले आहे तेही जाणून घेऊ यात.
हेही वाचाः Money Mantra : ICICI बँकेकडून फेस्टिव्ह बोनांझाला सुरुवात, तुम्हाला २६००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार
आरबीआय गव्हर्नर यांनी दिली ‘ही’ माहिती
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २ हजार रुपयांच्या नोटेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मे महिन्यापासून परत आलेल्या ३.४३ लाख कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटांपैकी ८७ टक्के नोटा बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात आल्या आहेत. आजही १२ हजार कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा बाजारात गोठल्या असून, बँकिंग व्यवस्थेत परत आलेल्या नाहीत. बँकाही या नोटांच्या प्रतीक्षेत आहेत. १२ हजार कोटी रुपये कमी नाहीत. अशा परिस्थितीत ७ ऑक्टोबरनंतर या पैशाचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा पैसा वाया जाणार का? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावत असतात.
हेही वाचाः ‘बुलेट’ परतफेड योजना म्हणजे काय? ज्यावर RBI ने केली मोठी घोषणा; सोन्याचा कर्जाशी काय संबंध?
उद्यानंतर काय होणार?
७ ऑक्टोबर २०२३ नंतर २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी फक्त १९ आरबीआय जारी कार्यालयांमध्ये असेल. प्रत्येक व्यवहारासाठी २० हजार रुपयांच्या नोटा ठेवण्याची कमाल मर्यादा असेल. RBI च्या १९ इश्यू कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयात लोक किंवा संस्था त्यांच्या भारतीय बँक खात्यांमध्ये कोणतीही रक्कम जमा करण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटा जारी करू शकतात. टपाल खात्यामार्फत या नोटा आरबीआयकडे पाठवण्याची सुविधाही आहे. तसेच न्यायालये, कायदेशीर अंमलबजावणी संस्था, सरकारी विभाग किंवा तपास किंवा अंमलबजावणीमध्ये गुंतलेले कोणतेही सार्वजनिक प्राधिकरण, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कोणत्याही परवानगीशिवाय १९ RBI जारी कार्यालयांमध्ये २ हजार रुपयांच्या बँक नोटा जमा किंवा बदलू शकतात.