भारताची चालू खात्यावरील तूट जानेवारी ते मार्च तिमाहीत १.३ अब्ज डॉलरवर आली आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ही तूट ०.२ टक्के आहे. व्यापार तुटीत झालेली घट आणि सेवांची वाढलेली निर्यात यासाठी कारणीभूत ठरली आहे. रिझर्व्ह बँकेने चालू खात्यावरील तुटीची आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. यानुसार, मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील चौथ्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट १.३ अब्ज डॉलरवर आली आहे. ही तूट मागील आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत १६.८ अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या २ टक्के होती. त्या आधीच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ती १३.४ अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या १.६ टक्के होती.

चौथ्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट कमी होण्यास काही प्रमाणात कमी झालेली व्यापारी तूट कारणीभूत ठरली आहे. चौथ्या तिमाहीत व्यापारी तूट ५२.६ अब्ज डॉलर होती. त्या आधीच्या तिमाहीत ती ७१.३ अब्ज डॉलर होती. सेवांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे व्यापारी तूट कमी झाली होती. संगणकीय सेवांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ झाल्याने आधीच्या वर्षाच्या तुलनेत सेवांच्या निर्यातीत वाढ नोंदवण्यात आली, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचाः सेन्सेक्सची ४४६ अंशांची उसळी; एचडीएफसी बँकेचे शेअर्स वधारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालू खात्यावरील शिल्लकही घटली

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये चालू खात्यावरील शिल्लक जीडीपीच्या तुलनेत २ टक्क्याने घटली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ही शिल्लक जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्याने घटली होती. याचबरोबर सरलेल्या आर्थिक वर्षात व्यापारी तूट २६५.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही तूट १८९.५ अब्ज डॉलर होती. दरम्यान, मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत परकीय चलन गंगाजळीत ५.६ अब्ज डॉलरची वाढ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचाः महागाईत टोमॅटोचे भाव भरमसाठ वाढले, १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले; जाणून घ्या कारण