मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजने आता ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ या उपकंपनीच्या माध्यमातून कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी ही घोषणा केली. जागतिक आघाडीच्या मेटा आणि गूगल या तंत्रज्ञान कंपन्याशी यासाठी भागीदारीचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

दशकभरापूर्वी डिजिटल सेवा हे रिलायन्सचे नवे विकास इंजिन बनले. आता एआय त्या पद्धतीने समोर येत आहे. जिओने देशात सर्वत्र आणि प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल सेवा पोहोचविण्याचे आश्वासन देऊन त्याची पूर्तता केली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स इंटेलिजन्स देशात प्रत्येक भारतीयासाठी सर्वत्र एआय पोहोचवेल. “सर्वांसाठी आणि सर्वत्र ‘एआय’ हा उद्देश ‘रिलायन्स इंटेलिजन्स’साठी ठेवण्यात आला आहे,” असे नमूद करून अंबानी म्हणाले की, ही नवीन कंपनी गिगावॉट क्षमतेची एआय विदा केंद्रे (डेटा सेंटर) उभारेल. यासाठी हरित ऊर्जेचा वापर केला जाईल. ही केंद्रे देशव्यापी स्तरावर प्रशिक्षण देण्याची भूमिका पार पाडतील.

रिलायन्स इंटेलिजन्सने मेटा आणि गूगलशी भागीदारी केली आहे. रिलायन्सच्या वार्षिक सभेत दूरदृश्य प्रणालीद्वारे मेटाचे संस्थापक व मुख्याधिकारी मार्क झुकरबर्ग आणि अल्फाबेट आणि गूगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई यांनी हजेरी लावली. या प्रसंगी अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंटेलिजन्सने चार प्रमुख ध्येय ठरविली आहेत. त्यात अत्याधुनिक एआय पायाभूत सुविधा, जागतिक भागीदारी, भारतासाठी एआय सेवा सर्व्हरची निर्मिती आणि एआय क्षेत्रातील गुणवत्तेला चालना यांचा समावेश आहे. या दिशेने पाऊल पडले असून, गुजरातमधील जामनगरमध्ये गिगावॉट क्षमतेचे एआय विदा केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे.

मार्क झकरबर्ग काय म्हणाले?

मेटा आणि रिलायन्स एकत्रितपणे भारतीय व्यवसायांना ओपन सोर्स एआय मॉडेल पुरविणार आहेत. एआयमुळे मानवी क्षमतांमध्ये वाढ होऊन उत्पादकता वाढत आहे. याचबरोबर सर्जनशीलता आणि नाविन्याला प्रोत्साहन मिळत आहे. रिलायन्सच्या माध्यमातून आम्ही आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू. – मार्क झकरबर्ग, संस्थापक व मुख्याधिकारी, मेटा

जामनगरमध्ये क्लाऊड सेवा

भारतासाठी एआय ही खूप मोठी संधी आहे. रिलायन्सच्या व्यवसायांना मदत व्हावी यासाठी गूगल आणि रिलायन्स भागीदारी करीत आहेत. ऊर्जा ते दूरसंचार आणि वित्तीय सेवा क्षेत्रात या माध्यमातून एआयचा वापर वाढविण्यात येणार आहे. रिलायन्ससोबत आम्ही जामनगरमध्ये क्लाऊड सेवा उभारत आहोत, असे गूगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई म्हणाले.