पीटीआय, नवी दिल्ली

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आघाडीची रंग निर्मात्या एशियन पेंट्सचे ३.५ कोटी समभाग गुरुवारी विकून बहुप्रसवा परतावा मिळविला. खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे एशियन पेंट्समधील हा ३.६४ टक्के हिस्सा विकला गेला आणि एसबीआय म्युच्युअल फंडाने ते ७,७०३ कोटी रुपये किमतीला खरेदी केले.

राष्ट्रीय शेअर बाजाराकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांची सहयोगी कंपनी सिद्धांत कमर्शियल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून एशियन पेंट्समधील साडेतीन कोटी समभाग म्हणजेच ३.६४ टक्के हिस्सा विकला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रत्येकी २,२०१ रुपये किमतीला या समभागांची विकी केली. यातून रिलायन्स इंडस्ट्रीजची म्हणजेच सिद्धांत कमर्शियल्सची हिस्सेदारी ४.९० टक्क्यांवरून १.२६ टक्क्यांपर्यंत (८७ लाख समभाग) घसरली आहे. तर समभागांच्या अधिग्रहणामुळे, एसबीआय म्युच्युअल फंडाची एशियन पेंट्समधील हिस्सेदारी १.५१ टक्क्यांवरून ५.१५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे

जागतिक आर्थिक संकट आणि लेहमन ब्रदर्सच्या पतनाच्या दरम्यान, जानेवारी २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या उपकंपनीद्वारे एशियन पेंट्समधील ४.९ टक्के हिस्सेदारी ५०० कोटी रुपयांना खरेदी केली होती. १७ वर्षांनंतर या गुंतवणुकीवर १४.४ पट असा बहुप्रसवा नफा तिने कमावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एशियन पेंट्सची चमक फिकी

एशियन पेंट्स सध्या तीव्र स्पर्धेचा सामना करत आहे. एलारा सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, भारतातील रंग बाजारात बिर्ला ओपसच्या प्रवेशामुळे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एशियन पेंट्सचा बाजार हिस्सा ५९ टक्क्यांवरून कमी होऊन ५२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीजने गुंतवणूक काढून घेतली आहे.