मुंबई : मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’मधील हिस्सेदारीत वाढ केली आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने विद्यमान महिन्यात खुल्या बाजारातून ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चे २६ लाखांहून अधिक समभाग खरेदी केले आहेत. परिणामी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’मधील हिस्सेदारी आता ५ टक्क्यांपुढे पोहोचली आहे.

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडकडे असलेल्या ‘पेटीएम’च्या समभागांमध्ये ०.४१ टक्के वाढ झाली आहे. या व्यवहाराचे मूल्यांकन अद्याप उघड करण्यात आलेले नाही. या व्यवहारानंतर, नोएडास्थित ‘पेटीएम’मध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडच्या मालकीचे एकूण समभाग ३.०२ कोटींवरून (४.७४ टक्के) ३.२९ कोटींवर (५.१५ टक्के) पोहोचले आहे.

‘पेटीएम’चे समभाग २० हून अधिक योजनांनी विकत घेतले असून यात मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड, फ्लेक्सी कॅप फंड, ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड आणि विविध ईटीएफ योजनांचा समावेश आहे.

समभागांची कामगिरी कशी?

मंगळवारच्या सत्रात ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा समभाग ४.४६ टक्क्यांनी वधारून १,२२६.२० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ७८,२९० कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागाने सरलेल्या ३ महिन्यात ४०.७९ टक्के, एका महिन्यात २२.४२ टक्के तर सरलेल्या आठवड्यात ९.४८ टक्के परतावा दिला आहे.