मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ३८ पैशांनी सावरून ८४.५८ रुपये प्रतिडॉलरवर बंद झाला. अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापार-करार यशस्वी होण्याची आशा आणि परदेशी निधीच्या पुनरागमनामुळे रुपयाला बळ मिळाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करारासंबंधी चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे विधान केल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मात्र भारत आणि पाकिस्तानमधील भू-राजकीय तणावामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८५.१५ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रात त्याने ८४.४७ रुपये प्रतिडॉलर हा उच्चांक तर ८५.१५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. सत्राअखेर रुपया ३८ पैशांनी वधारून बंद झाला. मंगळवारी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांनी वधारून ८४.९६ पातळीवर स्थिरावला.