वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंडसइंड बँकेच्या हिशेबातील त्रुटींचा उलगडा झाल्याने अडचणीत सापडलेल्या बँकेची आणि तिच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीची भांडवली बाजार नियामकानेही दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे, असे सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुरुवारी ‘असोचॅम’च्या कार्यक्रमात बोलताना सूचित केले.
रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील देशातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंडसइंड बँकेच्या लेख्यांमधील तफावतींची चौकशी सुरू आहे. सेबीला त्यासंदर्भात जे काही करायचे आहे, सेबीचे जे काही काम आहे, ते सेबी करत आहे. रिझर्व्ह बँकेचे काम ती करत असून कोणत्याही व्यक्तीकडून नियमांचे गंभीर उल्लंघन झाले असेल तर सेबी त्याबाबत चौकशी करत आहे. बँकेचे माजी मुख्याधिकारी व सह-मुख्याधिकारी यांनी ‘इनसायडर ट्रेडिंग’च्या नियमांचे उल्लंघन केले असेही आरोप आहेत. त्या संबंधाने चौकशी केली जाण्याचे संकेत आहेत.
हिशेबातील त्रुटींचा उलगडा झाल्याने अडचणीत सापडलेल्या या बँकेने तिच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या फसवणुकीत मोठी भूमिका बजावल्याची आणि त्याचाच बँकेच्या आर्थिक कामगिरीवर विपरित परिणाम झाल्याची कबुली दिली. तर बँक स्थापनेनंतरच्या १८ वर्षांत पहिल्यांदाच बँकेने २,३२८.९२ कोटी रुपयांचा निव्वळ तिमाही तोटा नोंदविला. बँकेतील अनियमिततेमुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह इतरही उच्चस्तरीय अधिकाऱ्यानी राजीनामे दिले आहेत. आर्थिक अहवाल आणि लेखापालनात सहभागी असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी फसवणूक केली असल्याचे बँकेच्या संचालक मंडळाने म्हटले आहे.
आयएएनएसच्या अहवालानुसार, २१ मे रोजी लेखापरीक्षण विभागाने उघड केले की, डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या मायक्रोफायनान्स (सूक्ष्मवित्त) विभागात १७२.५८ कोटी रुपयांचे शुल्क हे उत्पन्न म्हणून चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आले होते.
बँकेचे संचालक मंडळाने घोटाळ्यांसंबंधित मुद्दे खूप गांभीर्याने लक्षात घेतले आहेत. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि बँकेची प्रशासन आणि कामकाज सुधारण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. संचालक मंडळ ३० जूनपर्यंत नवीन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी रिझर्व्ह बँकेला शिफारस पाठवेल.- सुनील मेहता, अध्यक्ष, इंडसइंड बँक