नवी दिल्ली ः बेकायदेशीर व्यवहारांचा आरोप असलेली अमेरिकी संस्था जेन स्ट्रीटने ४८४३.५७ कोटी रुपयांचा दंड जमा केल्यानंतर बाजार नियामक ‘सेबी’ने तिच्या बाजारातील व्यवहारांवर पायबंद घालणारे निर्बंधही उठविले असल्याचे या प्रकरणातील माहितगार दोन सूत्रांनी सोमवारी सूचित केले.
जेन स्ट्रीटने सरलेल्या मंगळवारी ‘सेबी’च्या नावे विशेष खात्यात ४,८४३.५७ कोटी रुपयांची रक्कम जमा करताना, बाजार नियामकांनी लादलेले निर्बंध उठविण्याचीही विनवणी केली होती.
योग्य त्या प्रक्रियेनुसार चाचपणी करून या विनंतीची दखल घेतली जाईल, असे सेबीने त्यावर सत्वर उत्तरही दिले होते. त्यानंतर नियामकांकडून शुक्रवारी जेन स्ट्रीलला एक ईमेल संदेश पाठविण्यात आला. ज्यामध्ये दंडाची रक्कम जमा केल्यानंतर अंतरिम आदेशातून लादले गेलेले निर्बंधही आता गैरलागू ठरले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले.
सेबीने ३ जुलै रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशात, भारतीय बाजारात रोख्यांची खरेदी आणि विक्री करण्यास जेन स्ट्रीट समूहातील चार कंपन्यांवर बंदी घातली गेली होती. शिवाय बेकायदेशीरपणे कमावलेल्या नफ्याच्या उलटवसुली म्हणून दंडापोटी ४,८४३.५७ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे चौकशी पूर्ण होईपर्यंत नियामकांच्या विशेष खात्यात समतुल्य रक्कम जमा केल्यास जेन स्ट्रीट नित्य व्यापार पुन्हा सुरू करू शकते, असे आदेशात म्हटले होते. त्यानुरूप आता जेन स्ट्रीटला व्यापार सुरू करण्यास परवानगीही दिली गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तथापि जेन स्ट्रीट आणि सेबी, दोहोंकडून याची पुष्ठी करण्यासाठी पाठवलेल्या ईमेल प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळू शकलेली नाहीत, असे वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे. एनसई लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड या दोन्ही प्रमुख बाजारमंचांनाही या अमेरिकी संस्थेच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. जरी जेन स्ट्रीटला बाजारात पुन्हा व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी ती ‘ऑप्शन्स’मध्ये व्यापार करणार नाही, असे तिने सेबीला आश्वासन दिले आहे. जोपर्यंत सेबीला व्यवहारनीती स्पष्ट केली जात नाही, तोपर्यंत रोखीने (कॅश मार्केट) देखील व्यापार करण्याचा जेन स्ट्रीटचा विचार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.