पीटीआय, नवी दिल्ली
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने दिले आहेत. गीतांजली जेम्सच्या समभागांमध्ये इनसायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात फरार मेहुल चोक्सीची बँक खाती, शेअर आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जप्त करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. गीतांजली जेम्सच्या समभागांमध्ये इनसायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात १५ मे रोजी चोक्सीला जारी करण्यात आलेल्या नोटीसनंतर ही ताजी कारवाई करण्यात आली आहे. या नोटीसमध्ये १५ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास मालमत्ता तसेच बँक खाती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला होता. इनसायडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघनाप्रकरणी जानेवारी २०२२ मध्ये सेबीने लावलेला दंड चोक्सीने भरला नाही, त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.
गीतांजली जेम्सच्या प्रवर्तक गटाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेला चोक्सी हा नीरव मोदीचा मामा आहे. दोघांवरही सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. २०१८ च्या सुरुवातीला पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी आणि मोदी दोघेही भारतातून पळून गेले. भारतीय तपास संस्थांनी प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून एप्रिलमध्ये चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केली होती. गेल्या वर्षी तो वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमला गेला होता. भारत सोडल्यानंतर तो २०१८ पासून अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता. तर मोदीला मार्च २०१९ मध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती आणि सध्या तो त्या देशाच्या तुरुंगात आहे.
चोक्सीकडील २.१ कोटी रुपयांच्या प्रलंबित थकबाकीमध्ये १.५ कोटी रुपयांचा प्रारंभिक दंड आणि ६० लाख रुपयांचे व्याज समाविष्ट आहे, असे ४ जून रोजीच्या जप्तीच्या सूचनेत सेबीने म्हटले आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी, सेबीने सर्व बँका, डिपॉझिटरीज – सीडीएसएल आणि एनएसडीएल – आणि म्युच्युअल फंडांना चोक्सीच्या खात्यातून पैसे काढू घेण्यास मज्जाव केला आहे.
जानेवारी २०२२ मध्ये पारित केलेल्या आदेशात, नियामकाने चोक्सीवर १.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आणि त्याला एक वर्षासाठी भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली होती.
प्रकरण काय?
चोक्सीने गीतांजली जेम्सच्या समभागासंदर्भातील किंमत संवेदनशील माहिती राकेश गिरधरलाल गजेरा यांना दिली, ज्याने डिसेंबर २०१७ मध्ये गीतांजली जेम्समधील त्याचे ५.७५ टक्के संपूर्ण हिस्सेदारी विकली, ज्यामुळे कोणत्याही घटनेपूर्वी तोटा टाळला.